उद्योग आणण्याऐवजी भोंदूकडे आरोग्य तपासण्याला केसरकरांचं प्राधान्य

केसरकरांच्या भूमिकेची सखोल चौकशी व्हावी : रुपेश राऊळ
Edited by: विनायाक गांवस
Published on: March 23, 2026 20:13 PM
views 26  views

सावंतवाडी : महाराष्ट्र ही संतांची भूमी असून येथे अशोक खरात सारख्या भोंदू बाबाने महिलांवर अत्याचार करून धुमाकूळ घातला आहे. हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक असून ही बाब शरमेची आहे. ज्या लोकप्रतिनिधींकडून आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्राचे हित अपेक्षित होते, तेच लोक जर अशा भोंदू बाबांच्या आहारी जात असतील तर ही राज्यासाठी नाचक्की आहे. आमदार, खासदार आणि मंत्री जनतेला विकासाच्या गोष्टी सांगतात, मात्र स्वतःचे आयुष्य अशा भोंदू बाबांकडून घडवतात, मग हे लोक महाराष्ट्राचा काय विकास करणार? असा सवाल  राऊळ यांनी आज सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

यावेळी चंद्रकांत कासार आणि रमेश गावकर प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी श्री. राऊळ म्हणाले, सुसंस्कृत जिल्हा म्हणून नावलौकिक असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला काळिमा फासण्याचे काम केसरकर यांनी केले आहे. सावंतवाडीच्या मतदारांसाठी आणि जनतेसाठी ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. जनतेने त्यांना विकासाची संधी दिली होती मात्र, त्यांनी मतदारसंघात उद्योग-व्यवसाय आणण्याऐवजी भोंदू बाबाकडे जाऊन स्वतःचे आरोग्य तपासण्याला आणि स्वतःचा विकास करून घेण्याला प्राधान्य दिले. केसरकर हे त्या भोंदू बाबाचे भक्त आहेत, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली.‌केसरकर यांनी केवळ आपला राजकीय स्वार्थ जोपासण्याचे काम केले असून त्यांनी सावंतवाडीचा नावलौकिक धुळीस मिळवला आहे. जर त्यांना थोडी जरी लाज असेल तर त्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. या संपूर्ण प्रकरणाची आणि दीपक केसरकर यांच्या भूमिकेची सखोल चौकशी व्हावी, अशी आमची मागणी आहे. यासंदर्भात उद्या प्रांत कार्यालयात निवेदन देण्यात येणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही तक्रार पाठविली जाणार आहे. मुख्यमंत्री या प्रकरणात योग्य तो न्याय देतील आणि कडक निर्णय घेतील अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे. या अन्यायाविरुद्ध आणि भोंदूगिरीविरुद्ध उद्या होणाऱ्या आंदोलनात तालुक्यातील जनतेने आणि विशेषतः तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही श्री. राऊळ यांनी यावेळी केले.