प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी

सहा आरोग्य सेवकांना नियुक्ती आदेश प्रदान
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: March 23, 2026 20:28 PM
views 20  views

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या वतीने सरळ सेवा भरती प्रक्रियेअंतर्गत आरोग्य सेवक (पु.) पदासाठी सन 2025 मध्ये भरती प्रक्रिया पार पडली होती. या प्रक्रियेत प्रारंभी 47 उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली होती. मात्र, काही उमेदवारांनी रुजू होऊन नंतर राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदांसाठी प्रतीक्षा यादीतील सहा उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. या सहा उमेदवारांना आरोग्य विभागांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर त्यांच्या पसंतीनुसार आरोग्य सेवक (पु.) पदावर नियुक्ती आदेश देण्यात आले.

सदर नियुक्ती आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोदजी कामत व उपाध्यक्ष तुकाराम उर्फ दादा साईल यांच्या उपस्थितीत संबंधित उमेदवारांना प्रदान करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी हे उपस्थित होते. नवनियुक्त आरोग्य सेवकांच्या नियुक्तीमुळे उपकेंद्र कार्यक्षेत्रातील जनतेपर्यंत आरोग्य सेवा अधिक प्रभावी व तत्परतेने पोहोचण्यास मदत होणार असून ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेला बळकटी मिळणार आहे.