मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली रेल्वे मंत्रालयासह बैठक घ्यावी

आमदार केसरकरांची सभागृहात मागणी
Edited by: विनायाक गांवस
Published on: March 20, 2026 11:36 AM
views 46  views

सावंतवाडी : सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला कोकण रेल्वेच्या कुठल्याही सुविधा नाहीत. आवश्यक तो निधी कोकण रेल्वेकडे उपलब्ध नाही. तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबे मिळत नसल्याने मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली रेल्वे मंत्रालयासह बैठक लावून कोकणी प्रवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी केली. विधीमंडळात अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांनी आपली लक्षवेधी मांडली. 

केसरकर म्हणाले, सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला कोकण रेल्वेच्या कुठल्याही सुविधा नाहीत. आवश्यक तो निधी कोकण रेल्वेकडे उपलब्ध नाही. महाराष्ट्र सरकार अन् रेल्वे बोर्ड जॉईंट प्रोजेक्ट करतो. त्यामुळे त्यात याचा समावेश करण्यात आला. सिंधुदुर्गच्या पूर्वीच्या पालकमंत्र्यांनी या माध्यमातून रेल्वे स्थानकाच्या बाहेरील भागाचा विकास सार्वजनिक बांधकाम खात्यातून केला होता. मात्र, आता स्टेशन सुधारण आवश्यक आहे. महाराष्ट्रात हा वेगळा कार्यक्रम राबविण्याची गरज आहे. महाराष्ट्र शासनाच २१ टक्के योगदान कोकण रेल्वे बोर्डात आहे. त्यामुळे कोकण रेल्वे बोर्ड भारतीय रेल्वे विलीन होत नाही, तोपर्यंत वेगळी व्यवस्था महाराष्ट्र स्तरावर व्हावी.  यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन व रेल्वे मंत्रालयाची बैठक झाल्यास अधिकच्या सुविधा कोकणच्या प्रवाशांना मिळतील. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही रेल्वेंना थांबे नाहीत. त्या रत्नागिरीतून थेट गोव्याला जातात. त्यामुळे खासदार नारायण राणे यांना विनंती करून केंद्रीय रेल्वे मंत्र्यांबरोबर बैठक लावण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. यामुळे प्रवासी व पर्यटकांसाठी सोय होणार असून ट्रेन थांबली तर सर्वांचा फायदा होणार आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांना जिल्ह्यात दोन तरी थांबे  मिळायला हवेत यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी श्री. केसरकर यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिपूजन करून तब्बल ११ वर्ष रखडलेले सावंतवाडी रेल्वे टर्मिनस अन् न मिळणारे थांबे बघता राज्य सरकार आता कोणती भूमिका घेत याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.