कोलगावच्या पाणीप्रश्नाबाबत सावंतवाडी नगरपरिषदेत बैठक

Edited by: विनायाक गांवस
Published on: March 02, 2026 19:40 PM
views 26  views

सावंतवाडी : कोलगाव ग्रामस्थांच्या पाणीप्रश्नाबाबत आज सावंतवाडी नगरपरिषदेत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर आणि जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात झालेली ही चर्चा सकारात्मक ठरली असून लवकरच यावर कायमस्वरूपी तोडगा काढला जाईल, अशी ग्वाही देण्यात आली आहे.

दीड कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या पाळणे कोंड धरण प्रकल्पातील पाणी कोलगाव गावासह सावंतवाडी शहरालाही मिळणार आहे. या प्रकल्पाचे राहिलेले अपूर्ण काम तातडीने पूर्ण करून दोन्ही भागांना जास्तीचा पाणीपुरवठा करण्यासाठी नगरपरिषद प्रयत्नशील असल्याचे ॲड. निरवडेकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, कोलगावातून जाणाऱ्या पाईपलाईनमधून हे पाणी नरेंद्र डोंगरावर उभारण्यात आलेल्या टाकीमध्ये जाणार असून तेथून सावंतवाडी शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. मुबलक पाणी या नळपाणी योजनेतून मिळणार आहे. लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा प्रभारी नगराध्यक्ष निरवडेकर यांनी व्यक्त केली आहे.

कोलगावमधून जाणाऱ्या नळपाणी योजनेचे काम सध्या रखडलेले आहे. या पार्श्वभूमीवर मायकल डिसोजा यांनी आक्रमक पवित्रा घेत काम थांबवण्याचा इशारा दिला होता. या तणावाच्या पार्श्वभूमीवर आज नगर परिषदेच्या लोकमान्य टिळक सभागृहात तातडीने बैठक बोलावण्यात आली होती. या कामाला गती देण्यासाठी आवश्यक असलेला कायदेशीर करार लवकरच पूर्ण केला जाणार आहे. या योजनेमुळे केवळ कोलगावच नव्हे, तर सावंतवाडी शहराची पाण्याची गरजही भागणार आहे. तांत्रिक अडचणी दूर करून थांबलेली कामे तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले असून या बैठकीत ग्रामस्थांचे नेतृत्व जि.प. सदस्य मायकल डिसोजा यांनी केले. यावेळी पंचायत समिती सदस्य प्रणाली टिळवे, माजी पंचायत समिती सदस्य मेघश्याम काजरेकर,कोलगाव ग्रामपंचायत सदस्य निशिकांत पडते, बाळू गवस, मारिया डिमेलो, शिवदत्त घोगळे, शैलेश टिळवे आदी उपस्थित होते.