
सावंतवाडी : सावंतवाडी येथील पत्रकार तथा व्हॉईस ऑफ मीडिया’चे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष रूपेश पाटील यांना रविवारी पंढरपूर येथे राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम’ या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या वतीने दिला जाणारा उत्कृष्ट जिल्हाध्यक्ष पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर स्वागताध्यक्ष राणा सूर्यवंशी, इस्कॉनचे स्वामी मंगलदास, स्वामी चैतन्य महाराज, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, राष्ट्रीय महासचिव दिव्या भोसले, मुख्य संयोजक तथा संचालक गोरक्षनाथ मदने, कार्याध्यक्ष अनिल म्हस्के, महासचिव दिगंबर महाले, विजय चोरडिया यांसह अन्य उपस्थित होते. जगातील तब्बल ५६ देशांमध्ये कार्यरत आणि ४ लाख ७० हजार पत्रकार सदस्य संख्या असलेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ या जगातील क्रमांक एक पत्रकार संघटनेचे राज्य शिखर अधिवेशन १५ आणि १६ नोव्हेंबर रोजी पंढरपूर येथील इस्कॉन सभागृहात संपन्न झाले.
या अधिवेशनात निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा गौरव राजस्थान राज्याचे महामहिम राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते करण्यात आला.प्रा. रुपेश पाटील हे १९ वर्षांपासून पत्रकारिता या क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी सामाजिक भान राखत सातत्याने सकारात्मक पत्रकारिता केलेली आहे. सध्या ते संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष असून संघटनात्मक बांधणी, तसेच विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांध्ये सातत्याने सक्रिय योगदान देत आहेत. त्यांच्या एकूण कार्याची दखल घेत संघटनेच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला. त्यांच्या या स्पृहनीय यशाबद्दल प्रा. रूपेश पाटील यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.










