पालकमंत्री सावंतवाडीत !

नितेश राणेंच्या भुमिकेकडे सावंतवाडीच लक्ष !
Edited by: विनायक गांवस
Published on: November 10, 2025 18:51 PM
views 198  views

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सावंतवाडी दौरा केला. भाजप कार्यालयात तसेच राजवाडा येथे त्यांची बैठक झाली. माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांच्या युतीच्या भूमिकेनंतर ते सावंतवाडीत आले होते. बंद दाराआड त्यांची चर्चा झाल्यानं युतीबाबत नेमका निर्णय काय झाला ? याची जोरदार चर्चा शहरात सुरू झाली आहे. तसेच युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसलेंची उमेदवार निश्चित झाल्याचही बोलल जात आहे. 

पालकमंत्री नितेश राणे यांनी २०१९ नंतर पुन्हा एकदा सावंतवाडीच्या निवडणूकीत लक्ष घातलं आहे. भाजपनं स्वबळाचा नारा दिला आहे. दरम्यान, खासदार नारायण राणे यांनी महायुतीची भुमिका घेतल्याने राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे‌. या पार्श्वभूमीवर आज पालकमंत्री नितेश राणे यांनी सावंतवाडीत अचानक भेट दिली. येथील भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पहिल्यांदा त्यांनी भाजप कार्यालयात शहरातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर सावंतवाडी राजवाडा येथे त्यांनी राजघराण्याची भेट घेतली. राजघराण्याकडून नगराध्यक्षपदासाठी युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले इच्छुक आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांची बैठक पार पडली. नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून युवराज्ञींच नाव निश्चित झाल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. अनेक तर्कवितर्क यानिमित्ताने लढवले जात आहेत. भाजप कार्यालयात झालेल्या या महत्त्वाच्या बैठकीला युवराज लखमराजे भोंसले, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर, महिला शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर, माजी नगरसेवक ॲड परिमल नाईक, आनंद नेवगी, राजू बेग, उदय नाईक, दिपाली भालेकर, दिलीप भालेकर यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

भाजप कार्यालयातील बैठकीनंतर पालकमंत्र्यांनी येथील राजवाड्यासही भेट दिली. या भेटीनंतर सावंतवाडीच्या राजघराण्यातून नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांच्याबाबत नेमका कोणात निर्णय झाला ? हे समजू शकले नाही. बैठका आणि भेटीगाठी पाहता राजकारणात भाजप अन्  शिवसेनेची युती होणार की स्थानिक पातळीवर 'स्वबळ' कायम ठेवणार ? या चर्चांना उधाण आले आहे. पालकमंत्री नितेश राणेंच्या भुमिकेकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे.