
सावंतवाडी : एम सी ए ट्रेनिंग सेंटर, दादर येथे महाराष्ट्र कॅरम असोसिएशनची ५९ वी कुमार गट राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धा पार पडली. राज्यभरातून १६० पेक्षा अधिक खेळाडू तर सिंधुदुर्गच्या १२ खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला. २१ वर्षांखालील मुलींच्या गटात कनेडी, कणकवलीच्या दिक्षा चव्हाणने अंतिम सामन्यात रत्नागिरीच्या आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक विजेत्या आकांक्षा कदमला कडवी टक्कर दिली.
तीन सेट पर्यंत रंगलेल्या या लढतीत दिक्षाला १५ - १६, १८ - ०५, ०४ - २१ असा निसटता पराभव स्विकारावा लागला. आंतरराष्ट्रीय कॅरमपटू आकांक्षा आपल्या अनुभवाच्या जोरावर दिक्षा चव्हाणवर वरचढ ठरली. राज्य कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष यतिन ठाकूर, मानद सचिव अरुण केदार, सह सचिव केतन चिखले, मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे कार्याध्यक्ष धनंजय पवार व खजिनदार संजय देसाई यांच्या हस्ते विजेत्यांना चषक व प्रमाणपत्र देण्यात आले.सिंधुदुर्गच्या दिक्षा चव्हाणची १ नोव्हेंबर २०२५ पासून ग्वोलीयर, मध्यप्रदेश येथे होणाऱ्या ५० व्या सब जुनियर राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. तिचे सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशन व सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम परिवारा तर्फे अभिनंदन करत स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.










