
सावंतवाडी : आरोग्य समस्या सोडविण्यासाठीच्या सामाजिक कार्यकर्ते ॲड. अनिल निरवडेकर यांच्या पुढाकाराला भाजप युवा नेते विशाल परब आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी साथ दिली. या सामूहिक प्रयत्नातून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला अखेर एक फिजिशियन डॉक्टर मिळाले आहेत.
गेले काही दिवस फिजिशियन डॉक्टर नसल्यामुळे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात समस्या होती. एकीकडे कार्यरत डॉक्टर आणि कर्मचारी अतिरिक्त कामाचा ताण सहन करत होते. तर दुसरीकडे गोरगरीब जनतेला योग्य उपचार मिळत नव्हते, ज्यामुळे त्यांच्यात संतापाची भावना होती. रुग्णालयातील उपलब्ध वैद्यकीय सामग्रीचा पूर्ण वापर होण्यासाठी आणि सर्जरीसह अनेक आजारांवर उपचार होण्यासाठी एका फिजिशियनची नितांत गरज होती. मात्र, शासनाकडून सध्या अशा नेमणुकीसाठी आर्थिक तरतूद होणे शक्य नव्हते, त्यामुळे मानधनाची जबाबदारी वैयक्तिक स्तरावर स्वीकारण्याची गरज होती. ॲड. अनिल निरवडेकर यांनी 'सर्वांनी एकत्र येऊन निधी उभारूया' ही संकल्पना मांडली आणि सावंतवाडीतील विविध संस्था व दानशूर व्यक्तींना आवाहन केले. या आर्थिक स्व-सहयोगाच्या उपक्रमाचे रवींद्र चव्हाण यांनी कौतुक केले. रवींद्र चव्हाण आणि युवा नेतृत्व विशाल परब यांनी या निधीसाठी आपला महत्त्वपूर्ण सहयोग दिला, ज्यामुळे फिजिशियन आणि आवश्यक नर्सेस यांच्या एक वर्षाच्या मानधनाची व्यवस्था करणे शक्य झाले आहे.
या प्रयत्नांना यश मिळाले असून, सिंधुदुर्ग जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी पत्र देत, डॉ. शंतनू तेंडुलकर यांची फिजिशियन म्हणून तात्पुरती नेमणूक केली आहे. विशेष म्हणजे, डॉ. शंतनू तेंडुलकर यांनी हे पद मानधनापेक्षा सावंतवाडीकर जनतेची आजची गरज म्हणून स्वीकारल्याचे सांगितले आहे.