तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत आर.पी.डीचा बोलबाला

Edited by: विनायक गांवस
Published on: October 17, 2025 16:58 PM
views 55  views

सावंतवाडी : तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत आर.पी.डी कॉलेजच्या विद्यार्थिनींचा अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला. १३ ऑक्टोबर हा दिवस संयुक्त राष्ट्राने घोषित केल्यानुसार प्रतिवर्षी 'जागतिक आपत्ती धोके निवारण दिवस' म्हणून जगभरात साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधून मा. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांच्या आदेशानुसार जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 

त्या आदेशानुसार  गटशिक्षणाधिकारी सावंतवाडी यांनी तालुकास्तरीय 'आपत्ती व्यवस्थापन व लोकसहभाग' या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले. या स्पर्धेमध्ये राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज सावंतवाडीची विद्यार्थ्यांनी अनुक्रमे कुमारी रेश्मा पालवने प्रथम क्रमांक पटकाविला. यासाठी बक्षीस म्हणून रोख रक्कम 3000/- आणि प्रमाणपत्र देऊन  तर  कुमारी आर्या राणे हिने द्वितीय क्रमांक पटकावला म्हणून तिला रोख रक्कम 2000/ - चे बक्षिस व प्रमाणपत्र देऊन गटशिक्षणाधिकारी कार्यालय सावंतवाडी येथे गौरविण्यात आले. या विदयार्थिनींच्या अभिनंदनीय यशाबद्दल  शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विक्रांत सावंत, उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, सचिव व्ही. बी.नाईक, खजिनदार सी.एल.नाईक ,शालेय समिती अध्यक्ष अमोल सावंत,  सर्व पदाधिकारी व प्रशालेचे मुख्याध्यापक संप्रवी कशाळीकर, उपमुख्याध्यापक संजय पाटील, उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक यांनी कौतुक करून अभिनंदन केले. तसेच पुढे जिल्हास्तरीय निवडीस पात्र ठरल्याने त्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेसाठी मार्गदर्शक म्हणून लाभलेल्या सर्व विषय शिक्षकांचे मुख्याध्यापकांनी अभिनंदन करून कौतुक केले .