
सावंतवाडी : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सावंतवाडी तालुक्यातील ९ गटांचे आरक्षण जाहीर झाले असून या आरक्षणामुळे अनेक विद्यमान सदस्यांना मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे, या आरक्षण सोडतीमुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठीही तालुक्यातून संधी चालून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर काही विद्यमान सदस्यांसह इच्छुकांचे पत्ते कट झालेत.
तालुक्यातील ९ गटांपैकी ३ गट महिलांसाठी राखीव झालेत. तर उर्वरित ६ गट सर्वसाधारण खुला प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आलेत. जिल्हा परिषद गट आरक्षण ९ सदस्य तालुक्यात असून महिलांसाठी नामप्र राखीव मळेवाड, माडखोल हे मतदारसंघ आहेत. आंबोलीत सर्वसाधारण महिलेस संधी मिळाली आहे. तसेच माजगाव, इन्सुली, तळवडे, आरोंदा, बांदा, कोलगाव सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी राखीव झालेत. यात विद्यमान सदस्यांना व काही इच्छुकांना धक्का बसला आहे. या आरक्षण सोडतीमुळे अनेक दिग्गज विद्यमान सदस्यांना त्यांच्या हक्काच्या गटातून निवडणूक लढवणे आता शक्य होणार नाही अशीही परिस्थिती आहे.
सर्वसाधारण आरक्षणाचा फटका तिथे बसण्याची शक्यता आहे. गट सर्वसाधारण खुला झाल्याने इच्छुकांची समीकरणे बदलली आहेत. त्यामुळे विद्यमान सदस्यांना आता सुरक्षित मतदारसंघ शोधण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.आरक्षण सोडतीत झालेल्या बदलांमुळे सावंतवाडी तालुक्यातून जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठीही संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सर्वसाधारण पदासाठी अध्यक्षपद राखीव असल्याने त्यानुसार या तालुक्यातील नवनिर्वाचित सदस्यांसाठी संधीचे दरवाजे उघडणार आहेत.










