सावंतवाडी पंचायत समिती आरक्षण सोडत

Edited by: विनायक गांवस
Published on: October 13, 2025 11:57 AM
views 215  views

सावंतवाडी : आगामी पंचायत समिती निवडणुकीसाठी सावंतवाडी तालुक्यातील विविध गावांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम नुकताच प्रांताधिकारी हेमंत निकम आणि तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. आरक्षण सोडतीमुळे आता अनेक इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या असून काहींचे पत्ते कट झालेत. त्यात सभापती पदासाठी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असल्याने तळवडेच्या पंचायत समिती महिला सदस्यास सभापती पदाची संधी मिळणार आहे.

पंचायत समिती निवडणुकीच्या दृष्टीने हालचालींना वेग आला आहे. आज पंचायत समिती आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले. तहसीलदार कार्यालयात ही सोडत पार पडली. चिठ्ठ्या काढण्याचा मान तशुषी जाधव आणि भक्ती मुळीक या मुलीना मिळाला. यात कलंबिस्त, आंबोली, मळगाव, माजगाव, न्हावेली, इन्सुली, सातार्डा सर्वसाधारण खुला प्रवर्ग, माडखोल, कारिवडे, चराठे, मळेवाड, बांदा, तांबोळी सर्वसाधारण महिला, कोलगाव, आरोंदा ना.म.प्र महीला, विलवडे, शेर्ले ना.म. प्र, तळवडे अनु. जाती. महीलांसाठी राखीव झाला आहे. सभापती पदाचा चेहरा तळवडेत ठरणार आहे‌. 

हा संपूर्ण आरक्षण सोडतीचा कार्यक्रम अत्यंत पारदर्शकपणे प्रांताधिकारी हेमंत निकम आणि तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आला. आरक्षणाचे चित्र स्पष्ट झाल्यामुळे आता उमेदवारांसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. या सोडतीस सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते