
सावंतवाडी : वेत्ये कलेश्वर मंदिरलगतच्या ओहोळात वास्तव्यास असलेल्या सुमारे १२ फूटी महाकाय मगरीला आज वनविभागाच्या जलद कृती दलाच्या पथकाने जेरबंद केले. या मगरीला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
गेले काही दिवस ही महाकाय मगर या परिसरात फिरताना दिसून येत होती. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. या मगरीचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी स्थानिकांकडून वनविभागाकडे करण्यात आली होती. त्यानंतर आज सायंकाळी ४ च्या सुमारास तीला कैद करण्यात आले. वनविभागाच्या जलद कृती दलाचे प्रमुख बबन रेडकर यांच्यासह जवान शुभम कळसुलकर, आनंद राणे, प्रथमेश गावडे यांनी घटनास्थळी दाखल होत मोठ्या शिताफीने मगरीला जेरबंद केले. यावेळी वेत्ये सरपंच गुणाजी गावडे, जितेंद्र गांवकर, बाळू गांवकर, बाळू गावडे आदींसह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.










