
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येथील युवक युवतींना तसेच महिलांना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात व त्यांच्या उद्योग व्यवसायास हातभार लावावा या उद्देशाने सैनिक पतसंस्थेच्यावतीने युवा स्वावलंबी कर्ज योजना 'उद्योजकता अभियान ' सुरू करण्याचा महत्वाचा निर्णय नुकताच संचालक मंडळाच्या सभेत घेण्यात आला.
जिल्ह्यातील अनेक युवक व युवती स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्यासाठी इच्छुक असतात परंतु आर्थिक भांडवला अभावी त्यांना ते शक्य होत नाही म्हणुनच पतसंस्थेने वय वर्षे २१ ते ३५ या वयोगटातील नव्याने उद्योग व्यवसाय उभारण्याची इच्छा आहे. अशांसाठी 'युवा स्वावलंबी कर्ज योजना' सुरू केलेली आहे. अनेक होतकरू तरूण तरूणी स्वतः असा व्यवसाय सुरू करून स्वयं रोजगाराच्या संधी स्वतःलाच उपलब्ध करून देऊ शकतात. नोकरीच्या मागे न लागता स्वतःच्या रोजगारात वाढ होण्यासाठी या खास योजनेचा लाभ युवक युवतींना विविध छोटेखानी उद्योगांसाठी घेता येईल. एकुण प्रकल्प अहवालाच्या ७० टक्के हे पतसंस्थतेतर्फे कर्जाऊ स्वरूपात दिले जातील व ३० टक्के रक्कम ही स्वयं गुंतवणुक असेल, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवक युवतीसाठी सैनिक पतसंस्थेने सुरू केलेली ही अभिनव अशी योजना असुन याचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. ही योजना प्रत्यक्ष १ नोव्हेंबर २०२५ पासून संस्थेच्या सर्व शाखांमध्ये रितसर सुरू करण्यात येणार आहे. तरी जे युवक युवती नव्याने रोजगार सुरू करू इच्छीतात त्यांनी नजिकच्या शाखांच्या कार्यालायमध्ये संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. त्याचबरोबर सध्या ज्यांचे उद्योग व्यवसाय सुरू आहेत अशा महिला भगिनींसाठी नव्यानेच 'वीरांगना महिला कर्ज योजना' सुरू करण्यात आली आहे. यामध्ये पगार तारण, व्यवसाय तारण, पिग्मी तारण, पेन्शन तारण अशा विविध प्रकारात महिलांना रक्कम रू.५ लाख पर्यंतचे कर्ज हे कागदपत्रांच्या पुर्ततेअंती जलद स्वरूपात देण्यात येणार आहे. तर युवा स्वावलंबी कर्ज योजनेअंर्तगत रू.७ लाख पर्यतचे कर्ज वाटप करण्यात येणार आहे.
संस्थेने बँकासाठी लागणारा CIBIL हा सुध्दा तपासण्यासाठी स्वःस्तरावर तपासणी यंत्रणा सुरू केलेली आहे. एकदम कमीत कमी दरात ही सेवा पुरविण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष बाबुराव कविटकर व मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल राऊळ यांनी दिली. यावेळी संस्थेचे
व्हा. चेअरमन चंद्रकांत दाजी शिरसाट, संचालक दिनानाथ लक्ष्मण सावंत, सुभाष कुडाजी सावंत, भिवा बाबाजी गावडे, चंद्रशेखर शिवराम जोशी, शांताराम जयराम पवार, बाबु शिदु वरक, शामसुंदर पांडुरंग सावंत, संतोष वसंत मुसळे, गोपाळ शांताराम बाईत यांनी या नविन योजनास शुभेच्छा दिल्या आहेत.










