
सावंतवाडी : शहरातील मोती तलावात उडी घेऊन रमेश भगवान जाधव (वय ६१) या रिक्षा व्यावसायिकाने गुरुवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केली. रमेश जाधव हे सालईवाडा येथील रहिवासी होते. गेली अनेक वर्षे शहरात रिक्षा चालवत होते. गुरुवारी रात्री उशिरा ते आपली रिक्षा घेऊन राजवाड्या समोरील तलावाच्या रस्त्यावर आले आणि चप्पल बाहेर काढून थेट तलावात उडी घेतली.
काठावर असलेल्या नागरिकांनी ही घटना पाहिल्यानंतर आरडाओरडा करून पोलिसांना कळवले. नागरिकांनी तातडीने शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. अखेरीस, शुक्रवारी सकाळी बाबल अल्मेडा रेस्क्यू टीमच्या मदतीने पुन्हा शोध मोहीम राबवण्यात आली. त्यानंतर सोळा तासांनी रमेश जाधव यांचा मृतदेह तलावातील गाळात रुतलेल्या अवस्थेत सापडला. गुरुवार रात्रीपासून तलावाच्या काठावर उभ्या असलेल्या रिक्षेवरून ही आत्महत्या रमेश जाधव यांनीच केली असल्याची चर्चा होती. मृतदेह मिळाल्यावर ती बाब स्पष्ट झाली. ही बातमी कळताच मोती तलावाच्या काठावर नागरिकांनी व रिक्षा व्यावसायिकांनी मोठी गर्दी केली होती. मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला असून घटनेबाबत मुलगा कलश जाधव याने दिलेल्या खबरीनुसार सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मनमिळावू आणि हसऱ्या स्वभावाचे असलेले रमेश जाधव हे शहरातील अनेकांच्या परिचयाचे होते. मूळ सावंतवाडीतील विधानसभा अध्यक्ष ॲड. राहूल नार्वेकर व नार्वेकर परिवाराशी त्यांचे चांगले संबंध होते. त्यांच्या आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. सावंतवाडी पोलीस अधिक तपास करत आहेत. या हृदयद्रावक घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.










