आरोग्य, महावितरण समस्या मार्गी लागतील !

▪️ शिवसेना वाढविण्यासाठी माझा प्रयत्न : निलेश राणे
Edited by: विनायक गांवस
Published on: October 10, 2025 13:42 PM
views 169  views

सावंतवाडी : माजी मुख्यमंत्री, खास. नारायण राणेंचे राईट हॅण्ड माजी आम. राजन तेली आता माझ्या 'लेफ्ट हॅण्डला' आहेत. मुख्य नेते, एकनाथ शिंदे यांनी मला कपाळी गुलाल लावून जिंकवल आहे‌. माझ्या अपेक्षा कोणत्याही नाहीत. त्यामुळे यापुढे शिवसेना वाढविण्यासाठी माझा प्रयत्न राहणार असल्याचे विधान शिवसेना नेते, आमदार निलेश राणे यांनी केले. तसेच अधिवेशनात मांडलेल्या आरोग्य प्रश्न व महावितरण समस्यांबाबत थेट संबंधित खात्याचे सचिव आमच्या संपर्कात आहेत‌. ही सगळी काम मार्गी लागतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

राणे म्हणाले, दसरा मेळाव्यात माजी आमदार राजन तेली यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आमच्या कुटुंबात ते परत आलेत. त्यांचा प्रशासकीय अनुभव चांगला आहे. पक्ष वेगळे असताना देखील आम्ही नातं तुटू दिल नाही. पक्षाच्या निष्ठेसाठी एकमेकांच्या विरोधातही लढलो. माझा लहानपणापासून श्री.तेली यांना पहात आलोय. मोठा अनुभव त्यांना आहे. विधानपरिषदेतील त्यांच काम जवळून बघितल आहे. राजन तेलींच्या प्रवेशाचा फायदा शिवसेनेला होणार आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक पक्षप्रवेश शिवसेनेत होत आहेत. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना लोकमान्य काम केली. त्याचा फायदा आम्हाला होत आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी सढळ हस्ते त्यांनी मदत केल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद ही कशी लढवायची हे वरिष्ठ नेते ठरवणार आहेत. खासदार नारायण राणे त्याबाबत निर्णय घेतील असंही त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील सर्व समस्या दूर करण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. तसेच केसरकर आणि तेली यांनी पातळी सोडून टीका केली नाही. एकमेकांबाबतच वैमनस्य मी ऐकलं नाही. काल दोघांची तासभर चर्चा झाली. या विषयात दीपक केसरकर समाधानी आहेत. त्यांचा अनुभव मोठा आहे, कट्टर विरोधक असं नाही. यापेक्षा अधिक चांगले संबंध दोघांचे दिसतील, आमचा विषय पक्ष वाढविण्याचा आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. 

तसेच खास. नारायण राणेंचे राईट हॅण्ड असणारे राजन तेली आता माझ्या लेफ्ट हॅण्डला आहेत. एकनाथ शिंदे यांनी मला कपाळी गुलाल लावून जिंकवल आहे‌. त्यामुळे यापुढे शिवसेना वाढविण्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे. तर दीपक केसरकर यांना संधी द्यावी ही आमचीही मागणी आहे‌. वरिष्ठ त्यावर निर्णय घेतील. दरम्यान, विधानसभेतील लक्षवेधी बाबत विचारलं असता ते म्हणाले, महावितरण खात मुख्यमंत्री यांच्याकडे आहे. राज्यमंत्री यांच्यासह कोकणातील आमदारांची बैठक झाली. समस्यांबाबत आम्ही लक्ष वेधल असून खात्याचे सचिव आमच्या संपर्कात आहेत‌. समस्यांचे वर्गीकरण करून कामाला प्रारंभ झाला आहे. ही काम मान्य होत आहेत. तर आरोग्याबाबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच उर्वरीत बांधकाम सुरू झालं आहे‌. काही वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी वाढवीले आहेत. तेथील व्यवस्थापन होत आहे. सगळी काम मार्गी लागतील असा विश्वास आम. निलेश राणे यांनी व्यक्त केला.

यावेळी माजी आमदार राजन तेली म्हणाले, निलेश राणे यांना विशेष धन्यवाद देतो. आता कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. त्यांच्या मागे राहत निवडणूकीला सामोरे जाणार आहोत. विकासात्मक काम करण्यावर आमचा भर राहील, अशी माहिती श्री. तेली यांनी दिली. उबाठा शिवसेनेतून मोठ्या संख्येने कार्यकर्ते आमच्याकडे येतील. स्थानिक स्वराज्य संस्थांत विजय मिळवण्याचा आमचा उद्देश आहे असंही ते म्हणाले. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा विषय जिथे पोहोचवायचा तिथे पोहचवला आहे. नारायण राणे यांनी त्या बँकेच नेतृत्व केलं आहे. मलाही त्याबद्दल आपुलकी आहे. शिवरामभाऊ जाधवांची ही बँक आहे. बँक संदर्भात मला कोणत्याही प्रकारची नोटीस आलेली नाही. त्या नोटीसला मी दिलेल ते उत्तर होत अस श्री. तेली यांनी सांगितले. जिल्हा बँक व पालकमंत्री नितेश राणे यांच्यावरील टीकेबाबत विचारलं असता त्यांनी हा खुलासा केला. याप्रसंगी जिल्हाप्रमुख संजू परब, उपनेते अशोक दळवी, महिला जिल्हाप्रमुख ॲड निता सावंत-कविटकर, तालुकाप्रमुख बबन राणे, दिनेश गावडे, शहरप्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.