विलवडेत भुसारी दुकानात चोरी

Edited by: विनायक गांवस
Published on: October 10, 2025 10:46 AM
views 158  views

सावंतवाडी : विलवडे वडाकडे  रस्त्याला लागून असणारी दोन भुसारी दुकाने आणि सलून  गुरुवारी मध्यरात्री चोरट्याने फोडून चोरीचा प्रयत्न केला. ही घटना सकाळी निदर्शनास आल्यानंतर सरपंच प्रकाश दळवी यांनी याची खबर बांदा पोलीस ठाण्यात दिली. यानंतर पोलीसांनी घटनास्थळी दाखल होत तिन्ही दुकानाची तपासणी करत पंचनामा केला. 

यात परशुराम दळवी, दीपक नाईक, अभिजीत कदम या तिघांची दुकाने चोरट्याने फोडली. मात्र, चोरट्याच्या हाती काहीच लागले नाही. परशुराम दळवी यांची केवळ 500 रुपये ची चिल्लर चोरट्याने लंपास केली. या चोरीत जरी चोरट्याच्या हाती मोठी रक्कम लागली नसली तरी भरवस्तीत झालेल्या या चोरीच्या घटनेमुळे मात्र परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यातच गेल्या काही वर्षात या दशक्रोशीत चोरीचे प्रमाण वाढतेच असून दिवसा ढवळ्या चोरीच्या घटनाही घडत आहेत. चोरी करणारे चोरटेही मोकाट फिरत असून त्यांना पकडण्यातही अपयश येत आहे. यावर योग्य तो प्रतिबंध घालण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत. घटनेची माहिती मिळताच तातडीने पोलीस कॉन्स्टेबल आर. बी. तेली हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा केला असून पुढील तपास करीत आहेत.