
सावंतवाडी : सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती बी.आर. गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणारे वकील राकेश किशोर यांच्या कृत्याचा आणि माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर महामार्ग अधिकारी मुकेश साळुंके यांच्याशी कथित गैरवर्तन आणि मारहाणीप्रकरणी दाखल झालेल्या 'ॲट्रॉसिटी' गुन्ह्याविरोधात मराठा समाजाकडून दबावाच्या राजकारण चालल्याचा आरोप करत सावंतवाडी येथे ७ ऑक्टोबर २०२५ रोजी विविध संघटनांच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला.
६ ऑक्टोबर २०२५ रोजी न्यायालयीन कामकाजादरम्यान वकील राकेश किशोर यांनी मुख्य न्यायमूर्तींवर जूता फेकण्याचा जो निंदनीय प्रकार केला, त्याचा ७ ऑक्टोबर २०२५ रोजी सावंतवाडी येथे जाहीर निषेध करण्यात आला. लोकशाही आणि न्यायव्यवस्थेवरचा हा हल्ला असून अशा कृत्यांचा निषेध करणे आवश्यक आहे, असे मत या वेळी व्यक्त करण्यात आले.
तसेच माजी आमदार वैभव नाईक यांनी महामार्ग प्राधिकरणाचे कनिष्ठ अभियंता श्री. साळुंके यांच्याशी कथित शिवीगाळ आणि मारझोड केल्याप्रकरणी त्यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
या घटनेनंतर, ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत फिर्याद मागे घ्यावी आणि हा कायदा रद्द करावा, यासाठी मराठा बांधवांद्वारे मोर्चा काढून प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रकार सुरू असल्याचे सांगत त्याचाही या सभेत जाहीर निषेध करण्यात आला. या जाहीर निषेधाच्या वेळी ॲड. शिवराम विठ्ठल कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर वक्त्यांनी आपले विचार मांडले आणि दोन्ही घटनांचा निषेध केला. यावेळी उपस्थित असलेल्या प्रमुख वक्त्यांमध्ये यांचा समावेश होता. महेश परुळेकर (जिल्हाध्यक्ष, वंचित बहुजन), रमाकांत आधिव (आर.पी.आय. आठवले गट, राज्य सचिव). नारायण आशिंदेकर (बौद्ध हितवर्धक मंडळ). विनायक आधिव (डॉ. आंबेडकर समन्वय समिती, सल्लागार) सुरेश देवराव बराव खोब्रागडे,. जयद्रथ विष्णू सासोलकर,. बुधाजी पुंडलिक कबिळे, लक्ष्मण गंगाराम जिगुडकर आदी उपस्थित होते.










