
सावंतवाडी : वकील हा उत्तम नट आहे, त्याला कायद्यानेच नट बनवले आहे. वकिलाचा युनिफॉर्म हे देखणेपणाचे, विद्वत्तेचा आदर दर्शवणारे व्यक्तिमत्त्व आहे. वकिलांनी सेवावृत्तीचा दृष्टिकोन ठेवून व्यावसायिक नैतिकता पाळायला हवी, असे मत सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशनचे माजी जिल्हाध्यक्ष ॲड. राजेंद्र रावराणे यांनी व्यक्त केले. सावंतवाडी तालुका वकील संघटनेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या लेक्स डिस्कशन उपक्रमाच्या दुसऱ्या पर्वात 'वकिलांची जबाबदारी आणि कायदे नियम' या विषयावर ॲड. रावराणे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
ॲड. रावराणे पुढे म्हणाले की, वकिलाकडे नम्रता, अभ्यासवृत्ती आणि प्रत्येक गोष्टीचा शोध घेण्याची वृत्ती हवी. 'डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर' हे वागणे आदर्श वकील बनवू शकते. वकिलांनी बार कौन्सिलचे नियम व ॲडव्होकेट्स ॲक्ट १९६१ चे वाचन करून जबाबदारीने वागावे. ज्येष्ठांचा आदर राखावा.
उत्तम अभ्यासू वकील होण्यासाठी ब्रीफ आणि चार्जशीट व्यवस्थित वाचणे गरजेचे आहे. पक्षकार हा वकिलाचा आरसा असून, त्यांची गोपनीयता आणि नैतिक मूल्ये जपण्याचे कर्तव्य वकिलाचे आहे. जेव्हा वकील विश्वास संपादन करतो आणि विश्वासाला पात्र होऊन काम करतो, तेव्हा त्याची एक वेगळी ओळख निर्माण होते. त्यांनी नांदोस हत्याकांड, श्रीधर नाईक खून प्रकरण अशा गाजलेल्या खटल्यांतील अनुभव कथन केले.
यावेळी सावंतवाडी तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. बी. बी. रणशूर यांनी नवोदित वकिलांनी अभ्यासपूर्ण या व्यवसायात यावे. चांगला वकील होण्यासाठी तब्येत चांगली ठेवावी, व्यासंग जपावा आणि कोर्टाशी तसेच पक्षकारांशी प्रामाणिक राहावे, असे आवाहन केले. यावेळी व्यासपीठावर जिल्हा बार असोसिएशनचे माजी जिल्हाध्यक्ष ॲड. दिलीप नार्वेकर उपस्थित होते. ॲड. स्वप्नील कोलगावकर यांनी प्रास्ताविक केले, ॲड. रत्नकर गवस यांनी सूत्रसंचालन केले, तर ॲड. रणशूर यांनी आभार मानले.










