
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमामध्ये 'उपशामक काळजी' या विषयावर जनजागृती करण्याच्या आणि कार्यक्रमाची व्याप्ती वाढवण्याच्या उद्देशाने 'उपशामक काळजी' दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी जिल्हा आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ. तुषार चिपळूणकर यांनी स्पष्ट केले की, आरोग्य विभागामार्फत अति गंभीर अवस्थेत असणाऱ्या आणि ज्यांना चालता येत नाही किंवा जे बेडवर आहेत अशा रुग्णांची विशेष काळजी घेतली जात आहे. अशा रुग्णांची आरोग्य तपासणी त्यांच्या घरी जाऊन करण्याच्या दृष्टीने जिल्हा आरोग्य विभाग काम करत आहे. जास्तीत जास्त रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
'उपशामक काळजी' दिनानिमित्त उपस्थित लाभार्थ्यांना या कार्यक्रमाबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच, जिल्हा रुग्णालयातील या विभागामार्फत स्टाफकडून देण्यात येणाऱ्या आरोग्यविषयक सेवांची माहितीही देण्यात आली.
या कार्यक्रमादरम्यान लाभार्थ्यांना MR किट आणि स्टिकचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, आरोग्य अधिकारी डॉ. तुषार चिपळूणकर, परिचारिका प्रमुख शारदा असावे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक परिचारिका श्रद्धा सावंत यांनी केले, तर सूत्रसंचालन परिचारिका शिल्पा दळवी यांनी केले. विभागाचे स्टाफ नर्स, रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक या कार्यक्रमास उपस्थित होते.










