मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलमध्ये ज्ञानाचा सोहळा उत्साहात

Edited by: विनायक गांवस
Published on: October 06, 2025 18:56 PM
views 79  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल मध्ये 30 सप्टेंबर 2025 रोजी ज्ञानाचा उत्सव अर्थात सरस्वती पूजन सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला. यावेळी विद्येची देवता असलेल्या सरस्वतीचे  पूजन करण्यात आले.   

याप्रसंगी  साहित्य अकादमी पुरस्कार विजेते साहित्यिक प्रा.प्रवीण बांदेकर यांच्या संकल्पनेतून प्रशालेच्या इयत्ता पहिली ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक पुस्तक सरस्वतीचा ज्ञानरूपी प्रसाद म्हणून भेट देण्यात आले. या अभिनव उपक्रमासाठी  प्रा.प्रवीण बांदेकर, श्रीम . शिरीष बांदेकर, डॉ.अनिल फराकटे, प्रा. कविता तळेकर, धर्मराज परब, सुयोग धुरी, अमित परब, श्रीम. ज्योती चव्हाण, श्रीम.सरिता पवार, डॉ. शरयू आसोलकर ,प्रा. ज्ञानदा आसोलकर, राजू देसले ,मधुकर मातोंडकर, अमोल भोगले, श्री रामचंद्र दळवी, श्रीम. सुजाता राऊळ ,डॉ. नंदकुमार मोरे या शुभचिंतकांनी  एकूण 53000 रुपयांची 1018 पुस्तके प्रशालेस भेट दिली.

विविध विषयांशी संबंधित, मराठी, हिंदी इंग्रजी भाषेतील माहिती ,मनोरंजन, चरित्रे, विज्ञान, इतिहास, शब्दकोश, गोष्टीरूप साहित्य इत्यादी विषयांवरील पुस्तके प्रशालेतील विद्यार्थ्यांना भेट देऊन विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये  भर घालण्यासाठी व विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.यावेळी प्रशालेच्या आवाहनास अनुसरून प्रशालेच्या पालकांनी देखील विद्यार्थ्यांच्या वयोगटास साजेशी अशी पुस्तके प्रशालेच्या वाचनालयास दान केली. विद्यार्थ्यांना पुस्तके प्रदान करण्यासाठी सिं.जि.शि.प्र.मंडळाच्या चेअरमन हर हायनेस श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी भोंसले, संस्थेचे सदस्य श्री.जयप्रकाश सावंत, डॉ.सतिश सावंत, मुख्याध्यापिका श्रीम. अनुजा साळगांवकर आदी मान्यवर उपस्थित होते. ज्ञान सोहळा सुव्यवस्थितपणे पार पडण्यासाठी प्रशालेच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तसेच विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली.