
सावंतवाडी : गोवा आणि महाराष्ट्राच्या सीमेवर गेल्या काही दिवसांपासून फिरणाऱ्या 'ओंकार' हत्तीला सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी वन विभागाने मोहिम हाती घेतली आहे. सध्या हा हत्ती कास आणि सातोसे गावांमध्ये असून यामुळे भातशेतीचे मोठे नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर वन विभागाचा रेस्क्यू ऑपरेशनचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती उप वनसंरक्षक मिलीश शर्मा यांनी दिली.
उपवनसंरक्षक म्हणाले, वन विभागाचे पथक या हत्तीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. हत्तीला बेशुद्ध करून सुरक्षितपणे रेस्क्यू करण्यासाठी काही ठिकाणांची निश्चिती करण्यात आली आहे. महाराष्ट्र वन विभागाकडे आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत, तसेच कर्नाटक वन विभागालाही मदतीसाठी पत्र पाठवले असून त्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. प्राणी रेस्क्यू करणाऱ्या विविध टीमची मदतही यात घेण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान, 'ओंकार' हत्तीचे वय सुमारे १० वर्षे असून तो अधिक आक्रमक नाही. मात्र, त्याच्याकडून शेतीत होणारे नुकसान मोठे आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच ग्रामस्थांनी हत्तीच्या थेट समोर जाऊ नये. तो कुठेही दिसल्यास तात्काळ वन विभागाला कळवावे, वन विभाग तुमच्या मदतीसाठी तत्पर आहे असा विश्वास श्री. शर्मा यांनी दिला.










