नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना आग्रही !

'महायुती'समोर भुमिका मांडणार : दीपक केसरकर
Edited by: विनायक गांवस
Published on: October 06, 2025 15:07 PM
views 309  views

सावंतवाडी : आगामी सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने नगराध्यक्ष पदावर दावा केला आहे. आमचा नगराध्यक्ष असावा अशी आमची भूमिका आहे. महायुतीच्या बैठकीत हा विषय मांडणार असून महायुतीतून पद सेनेला सोडावं अशी मागणी करणार असल्याचे माजी मंत्री , आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले. 

आमदार केसरकर म्हणाले, सावंतवाडी ही एकमेव नगरपरिषद आहे जिथे आरक्षण नसतानाही महिला नगराध्यक्षा राहिलेल्या आहेत. शिवसेनेत अनेक सक्षम उमेदवार असून महायुतीमध्ये जागावाटपाची बोलणी सुरू आहे. माजी नगराध्यक्ष संजू परब हे शिवसेनेसोबत आहेत. तसेच गेली अनेक वर्षे सावंतवाडी शहराचा पाठिंबा आम्हाला राहिला आहे. त्यामुळे नगराध्यक्ष पद शिवसेनेकडेच राहावे, अशी मागणी महायुतीच्या बैठकीत करणार असल्याचे माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हाप्रमुख संजू परब उपस्थित होते. महायुतीतून शिवसेनेला नगराध्यक्ष पद सोडावे अशी भूमिका केसरकर यांची असल्याने आता महायुतीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी काय निर्णय घेतला जातो ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.