
सावंतवाडी : आंदोलनामुळे जनतेला त्रास झाल्याचा ठपका ठेवून ठेकेदाराने २० साफसफाई कामगारांना कामावरून कमी करण्याची नोटीस दिली होती. परंतु, कोणताही कामगार निलंबित झालेला नाही आणि होणारही नाही, अशी माहिती माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिली. सर्व कामगार पुन्हा कामावर रुजू झाले आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले.
साळगावकर म्हणाले की, नगरपरिषदेने एकाही कामगाराला कमी केले नाही. सॅनिटरी इन्स्पेक्टर विनोद सावंत यांनी स्वतः ही माहिती दिली आहे. यापुढे कोणत्याही कंत्राटी कामगारावर कारवाई होणार नाही, याची काळजी संघटना घेईल. संघटनेचे पूर्ण बळ कामगारांच्या पाठीशी आहे, असेही त्यांनी सांगितले.
साळगावकर आणि विलास जाधव यांनी सांगितले की, थोडा वेळ लागेल, पण आम्ही आमच्या न्याय हक्कांसाठी कायद्याची लढाई कायद्यानेच लढू. येत्या पंधरा दिवसांत कंत्राटी कामगारांना नक्कीच न्याय मिळेल अशी आम्हाला आशा आहे. या प्रयत्नांबद्दल सर्व साफसफाई कंत्राटी कामगारांनी प्रशासन, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर आणि विलास जाधव यांचे आभार मानले.










