
सावंतवाडी : येथील जवाहरलाल नवोदय विद्यालयातील दहावी आणि बारावीच्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी 'आजचे बदलते स्पर्धात्मक युग आणि सामाजिक बदल' या विषयावर एक विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हा सचिव, ॲड. संतोष सावंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
ॲड. सावंत यांनी आपल्या भाषणात सांगितले की, आजचे युग हे स्पर्धात्मक आणि तंत्रज्ञानावर आधारित आहे. अशा जगात यशस्वी व्हायचे असेल तर विद्यार्थ्यांनी शिक्षण काळातच आपले ध्येय निश्चित करायला हवे. त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगी असलेल्या गुणांवर विश्वास ठेवून, संयम, अपार कष्ट आणि मेहनत यांच्या जोरावर स्वतःच्या स्वप्नांची नगरी प्रत्यक्षात आणण्याचे आवाहन केले. हीच वास्तविक नगरी तुमच्या जीवनाची खरी गुरुकिल्ली ठरेल, असे ते म्हणाले. ते म्हणाले, "तुम्हाला कोण व्हायचं आहे, काय करायचं आहे हे तुम्ही विद्यार्थी दशेतच ठरवा. तुमच्या ध्येयानुसार स्वप्नांची नगरी तयार करा आणि ती सत्यात उतरवण्यासाठी आवश्यक असलेल्या वाटा शोधा." जोपर्यंत उत्तर मिळत नाही, तोपर्यंत शोध आणि संशोधन सुरू ठेवा. तुमची हीच गुणवत्ता समाजाला तुमच्या यशाची खरी ओळख करून देईल. छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकडोजी महाराज आणि इतर संतांनी त्यांच्या जीवनातून आपल्याला मार्ग दाखवला आहे. फक्त ‘मनी नाही भाव आणि देवा मला पाव’ असे न करता, तुम्ही तुमच्या उद्दिष्ट्यांवर लक्ष केंद्रित करा. तेव्हाच देव तुम्हाला मदत करेल.
यावेळी व्यासपीठावर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य ए. जी. कांबळे, गणित शिक्षक मतीन उक्कदखान, ग्रंथपाल ओमप्रकाश जिज्ञाशोप, मराठी शिक्षक जे. बी. पाटील, कारीवडे हायस्कूलच्या शिक्षिका सौ. अर्चना सावंत आणि जिल्हा रुग्णालयाच्या परिचारिका श्रद्धा सावंत उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या शेवटी, प्राचार्य श्री. कांबळे यांनी विद्यार्थ्यांना केवळ विज्ञानच नव्हे तर इतर शाखा आणि सामाजिक गोष्टींबद्दलही माहिती असणे आवश्यक आहे, यावर भर दिला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी असे विविध उपक्रम आयोजित केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शिक्षक श्री. खान यांनी केले.