भर पावसात उपोषण सुरू !

४ तास होऊनही फिरकले नाही अधिकारी | कंत्राटी कामगारांना वाली कोण ?
Edited by: विनायक गांवस
Published on: September 15, 2025 13:24 PM
views 113  views

सावंतवाडी : शहरातील कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी ठेकेदाराने बुडवलेली ६५ लाखांची पीएफची रक्कम मिळावी तसेच इतर मागण्यांसाठी नगरपालिकेसमोर उपोषण सुरू केले आहे. जवळपास ४ तास उपोषण सुरू असूनही, पालिकेचा एकही अधिकारी कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी फिरकला नाही. प्रशासनाच्या या मगरूरीचा तीव्र निषेध माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी नोंदविला आहे. 

पालिकेने नेमलेल्या ठेकेदाराने  कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचे सुमारे ६५ लाख रुपये थकवल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.  पालिका अधिकारी या प्रकरणात लक्ष घालत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. या उपोषणात केवळ कंत्राटी कर्मचारीच नाही, तर माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर व माजी  नगरसेवकांनीही सहभाग घेतला आहे. या सर्वांनी भर पावसात उपोषण करत आपला निषेध व्यक्त केला.

यावेळी बोलताना माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, ''पालिकेनेच ठेकेदारासोबत करारनामा केलेला असताना, कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांशी आमचा संबंध नाही, असे अधिकारी कोणत्या आधारावर सांगतात ? उपोषणाला बसणार म्हणून कारवाईची धमकी देता. समोर या, मग बघतो!'' असा इशारा त्यांनी दिला आहे. या आंदोलनामुळे शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होण्याची शक्यता असून जोपर्यंत त्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी केला आहे.