
सावंतवाडी : माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडी मतदारसंघातील ग्रामपंचायतींना 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान' मध्ये उत्कृष्ट कामगिरी करून राज्यासाठी एक आदर्श निर्माण करण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा "ड्रीम प्रोजेक्ट" असून या भागातील सर्व ग्रामपंचायतींनी दर्जेदार काम करावे.
सावंतवाडी पंचायत समितीने काझी शाहबुद्दीन हॉल येथे आयोजित केलेल्या या अभियानावरील कार्यशाळेत बोलताना केसरकर म्हणाले, "असे दर्जेदार काम करा की तुमची ग्रामपंचायत 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान' मध्ये चमकलीच पाहिजे. सिंधू रत्न योजनेला मुदतवाढ मिळाल्यास गावागावातील विकास कामांना निश्चितपणे गती मिळेल." आवश्यक ते सर्व सहकार्य दिले जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
केसरकर म्हणाले, या अभियानांतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीवर खास बक्षिसे आणि अनुदान दिले जाईल. त्यांनी विशेषतः सावंतवाडी तालुक्यावर लक्ष केंद्रित केले असून, सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी आपल्या गावांना राज्यस्तरावर आदर्श ग्रामपंचायत म्हणून ओळख मिळावी यासाठी प्रयत्न करावेत असे सांगितले.
आमदारांनी सिंधू रत्न आणि चांदा बांदा सारख्या योजनांचा उल्लेख करत, त्यांच्या माध्यमातून कुक्कुटपालन, पशुपालन आणि इतर अनेक योजनांचा लाभ गावकऱ्यांपर्यंत पोहोचवला गेल्याचे सांगितले. या योजनांना मुदतवाढ मिळाल्यास पर्यटन-आधारित विकासात्मक कामेही हाती घेता येतील, असे ते म्हणाले. मागासवर्गीय आणि दलित वस्त्यांच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. फक्त प्रस्ताव द्या, असे आवाहन त्यांनी केले. सावंतवाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये मोठ्या संख्येने सरपंच आणि ग्रामसेवक उपस्थित होते. व्यासपीठावर जिल्हा परिषद मुख्य लेखा अधिकारी श्री. मेश्राम, उपअभियंता अंगत शेळके, सहाय्यक गटविकास अधिकारी मंगेश जाधव, गटशिक्षणाधिकारी श्रीमती परब, सरपंच राजश्री सौदागर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कृषी अधिकारी एकनाथ सावंत यांनी प्रास्ताविक केले. तर प्रा. नारायण परब यांनी अभियानाबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. शुभदा सावंत यांनी केले.