
सावंतवाडी : नागपूरहून गोवा येथे पावडर घेऊन जाणाऱ्या एका आयशर टेम्पोचा आंबोली घाटात भीषण अपघात झाला. घाटातील नाना पाणी वळणावर ब्रेक फेल झाल्याने हा टेम्पो तब्बल १०० फूट खोल दरीत कोसळला. सुदैवाने, या अपघातात टेम्पो चालक सुमित दत्ताजी उजवे (३४, रा. नागपूर) किरकोळ जखमी झाला असून त्याचा जीव बचावला आहे.
ही घटना आज दुपारच्या सुमारास घडली. नागपूरहून गोव्याकडे निघालेला हा टेम्पो (क्र. एमएच-३१/एफसी-१४५३) आंबोली घाटातून जात असताना, नाना पाणी वळणावर त्याचे ब्रेक निकामी झाले. चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो थेट दरीत कोसळला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.स्थानिक लोकांच्या मदतीने चालकाला दरीतून बाहेर काढण्यात आले.