
सावंतवाडी : आरोग्यदृष्ट्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील यंत्रणा कोलमडलेली असून दिवसागणिक तब्बल ६ रूग्ण गोवा- बांबोळी येथे पाठविण्यात येत असल्याचे समोर आले आहे. मागील ४ महिन्यांत तब्बल ७४५ एवढे रूग्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून १०८ ने गोवा बांबोळी येथे पाठविण्यात आले आहेत.
जिल्हा रूग्णालय सिंधुदुर्ग, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात एका क्षणानंतर म्हणावे तसे उपचार मिळत नाहीत. येथील डॉक्टर आपल्या परीनं सर्वोतोपरी सेवा देण्याचे काम करतात. मात्र, एकाक्षणाला त्या रूग्णांला गोवा-बांबोळी येथे पाठवावे लागते. याची आकडेवारी बघितली तर दिवसाला किमान ६ रूग्ण जिल्ह्यातून गोवा बांबोळीला पाठविण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. एप्रिल ते जुलै या चार महिन्यांतच तब्बल ७४५ रूग्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोव्यात रेफर झालेत. ही आकडेवारी फक्त १०८ असून अन्य खाजगी रूग्णवाहिकांनी गोव्यासह अन्य ठिकाणी गेलेल्या रूग्णांची संख्या वेगळीच आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होऊन देखील परिस्थिती बदलेली नाही. मेडीकल कॉलेजमुळे परिस्थिती बदलेल असं वाटल होत मात्र, परिस्थिती आणखीन बिघडली आहे. जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आलेला रूग्ण काही काळानंतर गोवा बांबोळीला पाठविण्यात आल्याचेही प्रकार आहेत. जिल्ह्यात नसलेल्या सुविधा, असलेल्या डॉक्टरांवर येत असलेला ताण व म्हत्वाच म्हणजे रिक्त पद याला कारणीभूत ठरत आहे. शासन दरबारी याबाबत पाठपुरावा करूनही ही परिस्थिती बदलत नाही आहे. शिवसेना आमदार निलेश राणे यांनी तर भर सभागृहात याची चिरफाड केली होती. मात्र, त्यानंतर देखील राज्य सरकार व शासनाकडून सिंधुदुर्ग जिल्हा दुर्लक्षित राहिला आहे. काही रूग्णालयात हार्ट फिजीशीयन, न्युरो लॉजीस्ट सारखी महत्वाची पदे रिक्त आहेत. यामुळे असलेल्या डॉक्टरांवर देखील अतिरिक्त ताण पडत आहे. शासनाने हजर होण्याचे आदेश देऊन देखील काही डॉक्टर हजर होत नाहीत. ते का हजर होत नाहीत ? हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे या गंभीर प्रश्नी राज्य सरकार कसा मार्ग काढणार ? हा मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. तसेच या रूग्णालयांची श्रेणीवाढ करण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशीही मागणी आता जोर धरू लागली आहे.










