
सावंतवाडी : बांदा दशक्रोशीतील शेतकऱ्यांनी दोनच दिवसांपूर्वी भाजपा बांदा मंडल उपाध्यक्ष गुरु कल्याणकर यांचे नेतृत्वाखाली जिल्हा कृषी उपसंचालक ज्ञानेश्वर बढे यांची भेट घेऊन अतिवृष्टीमुळे नारळ-सुपारीच्या होणाऱ्या नुकसानीबाबत निवेदनाद्वारे माहिती दिली होती. तात्काळ पंचनामे करण्याची मागणी देखील केली होती.
त्यानुसार, तात्काळ कृषी विभागाकडून अधिकारी वर्गाची टीम पाहणी करता आज बांदा येथे दाखल झाली होती. यामध्ये गोरखनाथ गोरे,तालुका कृषी अधिकारी सावंतवाडी अजुमुद्दीन सरगुरु व मनाली परब, उप-कृषी अधिकारी पुनम देसाई, रसिका वसकर व मिलिंद निकम, सहायक कृषि अधिकारी इत्यादी अधिकारी वर्ग सामील होते. या टीमने बांदा तसेच दशक्रोशीतील गावांमधील राजेंद्र सावंत, दिनेश देसाई, सदाशिव मोर्ये, महादेव वसकर, शरद सावंत, चंद्रकांत भिसे, भरत सावंत, आत्माराम बुस्कुटे, रामा सावंत, गजानन सावंत, लक्ष्मण सावंत, आत्माराम सावंत आदी शेतकऱ्यांच्या नारळ-सुपारीच्या बागांमध्ये प्रतिनिधिक स्वरूपात प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली असता शेतकऱ्यांचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे त्यांनी देखील मान्य केले. याबाबतचा सकारात्मक अहवाल तात्काळ वरिष्ठांकडे पाठवणार असल्याचे सांगितले.
कृषी विभागाने तात्काळ दखल घेतल्याने शेतकरी वर्गाकडून समाधान व्यक्त करण्यात आले तसेच नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी देखील व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, हा प्रश्न केवळ बांदा दशक्रोशी मर्यादित नसून संपूर्ण सिंधुदुर्गात नारळ-सुपारीच्या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकऱ्याचे आर्थिक गणितच बिघडले आहे. त्यामुळे केवळ पाहणी व आश्वासन देऊन दिशाभूल न करता शेतकऱ्यांना प्रत्यक्षात नुकसान भरपाई मिळणे महत्त्वाचे आहे. तरच जिल्ह्यातील गोरगरीब शेतकरी पुन्हा उभा राहू शकेल. याकरता पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करणार असल्याचे भाजपा बांदा मंडल उपाध्यक्ष गुरु कल्याणकर यांनी सांगितले










