
सावंतवाडी : वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून वारंवार चौकशीचे आश्वासन देऊनही कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगार यांनी सोमवार, १५ सप्टेंबर २०२५ पासून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर पुन्हा उपोषण सुरू करण्याचा निर्धार केला आहे. तक्रारदारांना योग्य वागणूक मिळणे, तसेच एफआयआर आणि चार्जशीट वेळेत दाखल करणे या मागण्यांसाठी हे उपोषण असल्याचे त्यांनी प्रसिद्धीपत्रकातून स्पष्ट केले आहे.
बरेगार यांनी २१ ऑक्टोबर २०१९ रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत, कुडाळ पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनी तक्रार दाखल करताना अत्यंत हीन वागणूक दिल्याचा आरोप त्यांनी केला होता. तसेच, त्यानंतरच्या काळात पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी एफआयआर दाखल करण्यास व त्यानंतर चार्जशीट दाखल करण्यास जाणीवपूर्वक विलंब केल्याचे म्हटले होते. याव्यतिरिक्त, फुलचंद मेंगडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी धाडीत जप्त केलेल्या दारूच्या बाटल्या आपापसात वाटून घेतल्याचाही गंभीर आरोप त्यांनी केला होता.
या तक्रारीच्या अनुषंगाने, गेल्या चार वर्षांत तीन वेगवेगळ्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी व एका सहायक पोलीस निरीक्षकाने चौकशी केली. मात्र, कोणत्याही चौकशीतून कारवाईची स्पष्ट शिफारस करण्यात आली नाही असं त्यांचे म्हणणे आहे. चौकशीतील दिरंगाईमुळे संतप्त झालेल्या बरेगार यांनी यापूर्वी ७ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. त्यावेळी ८ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हा विशेष शाखेचे पोलीस उपाधीक्षक विकास बडवे यांनी त्यांना एक लेखी आश्वासन दिले. या पत्रात, तक्रारीची चौकशी उपविभागीय अधिकारी, कणकवली यांच्याकडे सोपवली असून ती चार आठवड्यांत पूर्ण करून याबाबत माहिती दिली जाईल, असे नमूद केले होते. या आश्वासनानंतर बरेगार यांनी उपोषण स्थगित केले होते.
मात्र, चार आठवड्यांचा कालावधी उलटूनही त्यांना कोणतीही माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे, वरिष्ठांकडून पुन्हा एकदा केवळ आश्वासने देऊन वेळ मारून नेल्याचा आरोप करत त्यांनी १५ सप्टेंबर २०२५ पासून पुन्हा उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. सामाजिक जबाबदारी म्हणून उपोषण करत असल्याचे श्री. बरेगार यांनी सांगितले. त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये तक्रारदारांना पोलीस ठाण्यात योग्य वागणूक मिळावी, एफआयआर व चार्जशीट वेळेत दाखल व्हावी. धाडीमध्ये जप्त केलेल्या दारूच्या बाटल्या वाटून घेणाऱ्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई व्हावी व उपोषणकर्त्यांवर कोणत्याही प्रकारची खोटी कारवाई करू नये या सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत आपले उपोषण सुरूच राहील, असे श्री. बरेगार यांनी स्पष्ट केले आहे.