जबाबदार कोण ? ; काय म्हणतेय जनता ?

Edited by: विनायक गांवस
Published on: September 13, 2025 19:34 PM
views 51  views

सावंतवाडी : उपजिल्हा रूग्णालयात नियुक्ती करूनही फिजीशीयन हजर होत नाही, त्यामुळे असलेले डॉक्टर देखील टार्गेट होतायत. जीवाची पर्वा न करता सेवा देणाऱ्या देवदुतांना मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतं असून याला जबाबदार कोण ? असा सवाल‌ कोकणसादच्या माध्यमातून करण्यात आला होता. यावर जनतेनं आपल म्हणणं मांडलं आहे. 

यात प्रसाद अरविंदेकर म्हणतात, माझ एक मत मल्टिस्पेशालिटी थोडं विषय बाजूला ठेवून आपलं सावंतवाडी हॉस्पिटल ला लागणारे डॉक्टर, आधुनिक ऑपेरेशन थिएटर, अपघात विभाग एवढं जरी केलं तरी खूप आहे. 8 दिवसापूर्वी मी माझ्या मित्राला प्रेशर आणि डायबेटीससाठी ऍडमिट केलं. फोटोत दिसणाऱ्या डॉक्टरने रूग्णाला गोवा-बांबोळी ला पाठवले. एवढे, साधे उपचार पण या हॉस्पिटलला होत नाही, बाकीच सोडून द्या. तर देव्या सुर्याजी म्हणाले, आरोग्यमंत्री यांची आम्ही स्वतः जाऊन भेट घेऊन सत्य परिस्थिती मांडली, प्रत्यक्षात आंदोलने केली. याबाबत सर्व राजकीय पुढारी यांना निवेदने वेळोवेळी देऊन पाठपुरावा केला. तरीही आरोग्याची स्थिती व्हेंटिलेटरवरच. सुपर स्पेशालिटी, मल्टीस्पेशालिटी पुढे जेव्हा केव्हा होईल तेव्हा होईल. पण, जे उपजिल्हा रुग्णालय आहे ते कायमस्वरूपी सुस्थितीत राहावं हिच प्रामाणिक इच्छा व आमचे प्रयत्न शेवटपर्यंत राहतील. 

दरम्यान, रवींद्र मांजरेकर म्हणतात की, संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात हीच परिस्थिती आहे. आमच्या खारेपाटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तर गेले कित्येक वर्षे MBBS डॉक्टर उपलब्ध नसून शवविच्छेदन करताना खूप अडचणी येतात. गेले कित्येक वर्षे आधुनिक पद्धतीच्या प्रसुती सुविधा नाहीत. कायमस्वरूपी रुग्णवाहिका नाही आहे. आरोग्य सेवेचा बोजवारा आहे. आरोग्य व्यवस्थेबाबत बिकट परिस्थिती आहे सिंधुदुर्गाची असं मत अनिकेत पाटणकर यांच आहे. दुर्भाटकर डॉक्टर रिटायर्ड होईपर्यंत माता भगिनींना तरी टेन्शन नव्हतं असं लिलिता तेंडोलकर म्हणाल्यात. 

विनय वाडकर म्हणाले, केसरकर साहेबांना विचारा ते शिंदे साहेबांना विचारून सांगितलं. सचिन चव्हाण म्हणाले, संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात हीच परिस्थिती आहे. तर प्रदिप देसाई, आम्हाला काय वाटत नाही. मला नाही अब्रु मी कशाला घाबरू अशी अवस्था आहे. तसेच सिद्धार्थ नरसुले यांचे मत आहे वेंगुर्ला रूग्णालयातही अशीच परिस्थिती आहे. हरीश पाटणकर म्हणाले, कधी थांबणार रुग्णांच्या बांबोळीच्या फेऱ्या ? व कोकणातील राजकारणी लोक जबाबदार असल्याची कमेंट प्रविण राणेंनी केली आहे. एकंदरीतच, सामान्य जनतेचा रोष आरोग्य समस्यांबाबत दिसून येतो. राज्यकर्ते अन् शासनकर्तेच या परिस्थितीला जबाबदार असल्याचा सूर जनतेच्या व्यक्त झालेल्या प्रतिक्रियांतून उमटताना दिसतो.