विलवडेत बेकायदा दारू वाहतूकीवर कारवाई

Edited by: विनायक गांवस
Published on: September 13, 2025 16:42 PM
views 322  views

सावंतवाडी : बांदा पोलिसांनी गोवा बनावटीच्या दारूची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या तिघांकडून १ लाख ४७ हजार ४८० रुपयांची दारूसह १६ लाख ४७ हजार ४८० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पहाटेच्या सुमारास विलवडे येथे करण्यात आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,बांदा पोलिसांनी विलवडे येथे नाकाबंदी केली होती.यावेळी (एमएच १२ पीएच ९९४४) या क्रमांकाची पांढऱ्या रंगाची इनोवा क्रिस्टा कार संशयास्पद स्थितीत दिसली. पोलिसांनी या गाडीची तपासणी केली असता त्यात गोवा बनावटीची दारू मोठ्या प्रमाणात आढळली. याप्रकरणी विशाल शिवाजी वाबळे (वय २५),गौरव किरण रणधीर (वय २६),आणि साहिल अशोक लोंढे (वय २३) यांना ताब्यात घेतले.हे सर्वजण पुणे जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांच्याकडून एकूण रु.१ लाख ४७ हजार ४८०/- किमतीची विविध प्रकारची दारू जप्त करण्यात आली. ज्यात व्हिस्की आणि रमच्या बाटल्यांचा समावेश आहे.दारूसह पोलिसांनी १५ लाख रुपये किमतीची इनोवा क्रिस्टा कारही जप्त केली आहे.एकूण या कारवाईत पोलिसांनी रु. १६ लाख ४७ हजार ४८०/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी बांदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास पोलीस हवालदार श्री.तेली करत आहेत.