
सावंतवाडी : शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला असून लहान मुलांवर हल्ले करणे, त्यांचा पाठलाग करणे असे प्रकार सर्रास घडत आहेत. यामुळे संतप्त झालेल्या ठाकरे शिवसेनेचे प्रवक्ते आशिष सुभेदार यांनी नगरपालिका प्रशासनाला या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याचा इशारा दिला आहे. अन्यथा, ही भटकी कुत्री पकडून थेट पालिकेच्या कार्यालयात सोडू, असा पवित्रा घेतला आहे.
गेले अनेक दिवस शहरातील नागरिक या भटक्या कुत्र्यांमुळे हैराण झाले आहेत. दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढत असल्यामुळे अपघातांचे आणि हल्ल्यांचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या गंभीर समस्येकडे पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सुभेदार यांनी ही भूमिका घेतली आहे. शहरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी पालिकेने यावर तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. जर पालिका प्रशासनाने वेळीच लक्ष दिले नाही, तर कुत्री पकडून पालिकेच्या दारात आणण्याचा इशारा त्यांनी दिला आहे, ज्यामुळे प्रशासनावरील दबाव वाढला आहे.










