
सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील सुमारे ६० कंत्राटी सफाई कामगारांना सणासुदीच्या काळातही पगार न मिळाल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. सुमारे तीन वर्षांचा पीएफ थकीत असताना, एक महिन्याचा पगार देण्याचे आश्वासनही पाळले गेले नाही. अखेर या कारभाराविरोधात १५ सप्टेंबर रोजी बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा कामगारांनी दिला होता. परंतु, आज ६० कामगारांच्या खात्यामध्ये पगार जमा करण्यात आल्याची माहिती माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिली आहे.
यामुळे मोठा दिलासा सफाई मित्रांना मिळाला आहे. श्री. साळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन होणार होते. मात्र, तत्पूर्वीच दणक्यानंतर जाग आलेल्या प्रशासनाने सावंतवाडी नगरपरिषदेच्या कंत्राटी कामगारांचे पगार अदा केलेत. कामगारांच्या खात्यामध्ये आज पैसे जमा होत आहेत. सुमारे ६० कामगारांचे पगार आज पूर्ण झालेत अशी माहीती माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिली आहे.
नूकतीच सावंतवाडी शहरातील गुरुकुल येथे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली कंत्राटी सफाई कामगारांची बैठक झाली होती.या बैठकीत कामगारांनी नगरपरिषदेच्या कारभारावर जोरदार टीका केली होती. प्रशासक तथा प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पगार आणि पीएफ देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, 'तांत्रिक कारणे' पुढे करत अधिकाऱ्यांनी यावर कोणतीही कार्यवाही केली नाही, असा आरोप कामगारांनी केला होता. सणाच्या तोंडावर पगार न मिळाल्याने कामगारांच्या कुटुंबाला आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागल्याचीही कैफियत त्यांनी मांडली होती. अखेर इशाऱ्यानंतर भानावर आलेल्या प्रशासनाकडून पगार अदा करण्यात येत आहे. यामुळे सफाई मित्रांना मोठा दिलासा मिळाला असून माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर व कामगारांच्या लढ्याला यश आले आहे.