'ती' साईडपट्टी सा. बांधकामला दिसली नाही ?

▪️ जाग येणार तरी कधी ?
Edited by: विनायक गांवस
Published on: September 11, 2025 19:03 PM
views 158  views

सावंतवाडी : जुन्या मुंबई-गोवा महामार्गावरील भगदाड तात्काळ बुजविण्याच काम पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून आदेश आल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने केलं. मात्र, या ठिकाणाहून १०० मीटरवर असणारी खचलेली साईडपट्टी आजही तशीच आहे. त्यामुळे ती साईडपट्टी बांधकाम अधिकाऱ्यांच्या डोळ्यांना दिसली नाही का ? असा सवाल केला जात आहे.

सावंतवाडी बसस्थानकात इलेक्ट्रिक एसटी बस चार्जिंग सेंटर उभारण्यासाठी कोलगाव वीज उपकेंद्र ते बसस्थानक या मार्गावर केबल टाकली होती. मात्र, यासाठी ठेकेदारानं मारलेले चर खडीन बुजवलेत. ते योग्य रितीने बुजवत डांबरीकरण करण्यात आलेलं नाही. यामुळे अपघाताला आमंत्रण मिळत असून मोठी दृर्घटना घडण्याची शक्यता आहे. याबाबत वारंवार तक्रारी, आवाज देखील उठविण्यात आलेत. मात्र, बांधकाम विभाग झोपेत आहे. लवकरच खडीकरण करू असं आश्वासन सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांनी देऊन आज दोन आठवडे निघून गेले. मात्र, परिस्थिती तशीच आहे. त्यात या रस्त्यावरून मोठी रहदारी असते. तसेच शाळा, हॉस्पिटल जवळ असून मोठ्या वर्दळीच हे ठिकाण आहे. परंतु, याकडे सार्वजनिक बांधकामकडून दुर्लक्ष केला आहे.  चरामुळे खचलेली साईडपट्टी पुन्हा पुर्ववत केलेली नाही. 


दरम्यान, काही दिवसांपूर्वी येथील आयटीआय समोर पडलेल भगदाड देखील पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानंतर बुजवल गेलं. तोवर हा विभाग झोपेतच होता. त्यात हे भगदाड बुजवताना साईड पट्टीही ठीक करतील अशी अपेक्षा होती. मात्र, तसं झालेलं नाही. तिथूनच दिसणारी अथवा ज्या रसत्याने अधिकारी आले त्या रस्त्याला नसलेली साईडपट्टी त्यांच्या डोळ्यांना दिसली नसेल का ? हा खरा सवाल उपस्थित होतोय. त्यात सर्वच काम जर मंत्र्यांचे फोन आल्यानंतरच सार्वजनिक बांधकाम विभाग करत असेल तर अशे जबाबदारीच भान नसलेले अधिकारी काय कामाचे ? अस म्हणण येथून प्रवास करणाऱ्या नागरिकांचे आहे.