सावंतवाडी : सावंतवाडी कार्यालय येथील जिल्हा परिषद, सिंधुदुर्गच्या उप-अभियंता कार्यालयातील कनिष्ठ सहाय्यक गौरांग परब यांच्यावर कामकाजात अडथळा आणल्याचा आणि गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. याबाबत गणपत वासुदेव कदम यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
कदम यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, निरावडे बाईतवाडी येथील रस्ता दुरुस्तीच्या कामासंदर्भात चर्चा करण्यासाठी सावंतवाडी उप-अभियंता कार्यालयात गेलो होतो. त्यावेळी वरिष्ठ अधिकारी श्री. कांबळी आणि श्रीमती देवरुखकर यांच्याशी बोलत असताना श्री. परब यांनी अचानक हस्तक्षेप करत मोठ्याने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. 'तुम्ही साहेबांशी बोला, आमच्या कर्मचाऱ्यांशी बोलू नका आणि कार्यालयाच्या बाहेर जा' असे सांगितले. यावर विचारणा केली असता, परब यांनी व्हिडिओ काढण्यास सुरुवात केल्याचे श्री.कदम यांचे म्हणणे आहे.
शासकीय अधिकाऱ्याच्या या गैरवर्तनाबद्दल श्री. कदम यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सखोल चौकशीची मागणी केली आहे. त्यांनी आपल्या तक्रारीत श्री. परब यांच्यावर कठोर कारवाई करण्याची आणि त्यांची तात्काळ बदली करण्याची मागणी केली आहे. अशा प्रकारे शासकीय कार्यालयात गोंधळ घालणाऱ्या आणि कामकाजात व्यत्यय आणणाऱ्या कर्मचाऱ्यांना योग्य ती समज द्यावी अशी अशी मागणीही श्री. कदम यांनी केली आहे.