
सावंतवाडी : वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर भाद्रपद शुद्ध चतुर्थीला विधिवत पूजाअर्चा करत लाडक्या गणरायाची घरोघरी प्रतिष्ठापना करण्यात आली होती. बाप्पाच्या आगमनाने सर्वत्र भक्तिमय वातावरणात झाले असून आज दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. गुरूवार सायंकाळनंतर मोती तलावात बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत गणेशमूर्ती विसर्जन सुरू होते. राजघराण्याच्या ऐतिहासिक गणरायाचं देखील राजघराण्याच्या उपस्थितीत विसर्जन करण्यात आले. राजवाडा व राजश्री तिसरे खेमसावंत यांच्या माठ्यातील गणपतीचे विसर्जन करण्यात आले. वाजत, गाजत मिरवणूक काढत श्रींना निरोप देण्यात आला. यावेळी राजेसाहेब खेमसावंत भोसले, राणीसाहेब शुभदादेवी भोसले, माजी उपनगराध्यक्षा अन्नपुर्णा कोरगावकर, माजी नगरसेविका ॲड. पुष्पलता कोरगावकर, काका मांजरेकर, पुरोहित शरद सोमण, सिताराम गवस, सचिन कुलकर्णी, अखिलेश कोरगावकर आदींसह गणेशभक्त उपस्थित होते.
तसेच ग्रामीण भागात देखील दीड दिवसांच्या गणेशाला पुढच्यावर्षी लवकर येण्याच वचन घेत जड अंतःकरणाने निरोप देण्यात आला. नदी, तलाव, पाणवठ्यांच्या ठिकाणी मूर्तींच विसर्जन करण्यात आले. यावेळी भजन, आरती, फटाक्यांच्या जयघोषानं परिसर दणाणून गेला होता. शहरात रात्री उशिरा मोठ्या भक्तिभावाने गणराला निरोप देण्यात आला. मोती तलाव येथे विसर्जनस्थळी नगरपालिकेतर्फे खास आयोजन करण्यात आले. पोलिसांचाही कडक बंदोबस्त होता. गणरायाला भक्तिभावाने निरोप देताना अनेकांचे डोळे पाणावले होते. गणेशभक्तांना कोणतीही समस्या भासू नये यासाठी यंदाही चोख व्यवस्था केली होती.