न. प. सफाई मित्रांचा पीएफ फंड थकीत

ठेकेदाराला नोटीस
Edited by: विनायक गांवस
Published on: August 28, 2025 17:31 PM
views 50  views

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी (पीएफ) फंडात गेल्या तीन वर्षांपासून पैसे जमा न केल्याबद्दल, प्रशासक तथा प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी संबंधित ठेकेदाराला 'कारणे दाखवा' नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. येत्या सात दिवसांत ठेकेदाराने आपली बाजू न मांडल्यास, त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला जाईल, असा सक्त इशाराही निकम यांनी दिला आहे. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या उपस्थितीत दोन दिवसांपूर्वी प्रांताधिकारी यांच्या आश्वासनानंतर कर्मचाऱ्यांच कामबंद आंदोलन मागे घेण्यात आले होते.

प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी आज मुख्याधिकारी अरविंद नातू यांच्यासह एक बैठक घेतली. या बैठकीत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दोन दिवसांपूर्वी आयोजित केलेल्या बैठकीचा आढावा घेण्यात आला. त्या बैठकीमध्ये सफाई कामगारांनी पीएफ फंड थकल्याची तक्रार केली होती. आजच्या बैठकीला ठेकेदार उपस्थित नव्हता, कारण तो पावसामुळे नाशिकहून वेळेवर पोहोचू शकला नाही, असे कारण देण्यात आले. तीन वर्षांपासून कर्मचाऱ्यांचा पीएफ फंड जमा न केल्याबद्दल ठेकेदाराला 'कारणे दाखवा' नोटीस पाठवावी. सात दिवसांत समाधानकारक उत्तर न मिळाल्यास, ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा. ठेकेदाराने कर्मचाऱ्यांना वेतनाची स्लिप  देणे बंधनकारक आहे. त्यामुळे पगाराची रक्कम स्पष्ट होईल आणि कर्मचाऱ्यांचा संशय दूर होईल.पीएफ फंड भरल्याची खात्री केल्याशिवाय नगरपालिकेने ठेकेदाराला वेतन अदा करू नये. यावेळी बैठकीला मुख्याधिकारी अरविंद नातू, प्रशासकीय अधिकारी वैभव अंधारे, अकाउंटंट बटवाल, आरोग्यनिरीक्षक विनोद सावंत, पाणीपुरवठा अभियंता धनंजय देसाई, सुपरवायझर दीपक म्हापसेकर, करनिर्धार अधिकारी शैलेश गवंडे यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते.