जनतेला सुखी - समाधानी ठेव

राजघराणे सावंत - भोसले कुटुंबियांचं गणरायाला साकडं
Edited by: विनायक गांवस
Published on: August 28, 2025 12:13 PM
views 248  views

सावंतवाडी : ऐतिहासिक वारसा लाभलेल्या सावंतवाडी संस्थानच्यावतीन दीड दिवसांच्या मंगलमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना देवघरात करण्यात आली. राजघराणे सावंत - भोसले कुटुंबियांकडून गणरायाची आराधना करत जनतेला सुखी, समाधानी, आनंदी ठेव असं साकडं घालण्यात आलं. 

पुरोहित शरद सोमण यांच्या मंत्रोच्चारात गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यानंतर पूजन, आरती, भजन आदी कार्यक्रम पार पडले. यावेळी राजघराण्याकडून गणरायाला मोदकांसह नैवैद्य अर्पण करण्यात आला.युवराज लखमराजे भोंसले यांनी गणेशचतुर्थीच्या शुभेच्छा देत गणराया व श्री देव पाटेकराच्या कृपाशीर्वादाने हा उत्सव काळ निर्विघ्नपणे पार पडवा. जनतेच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात असे मागणं केलं. तसेच युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी राजेसाहेब खेमसावंत भोंसले, राणीसाहेब शुभदादेवी भोंसले, युवराज लखमराजे भोंसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, राजकन्या उर्वशीराजे भोंसले, राजघराण्याचे जावई संदीप बोथीरेड्डी आदींसह गणेशभक्त उपस्थित होते.

दरम्यान, राजघराण्याचा शेंदूरी रंगाचा गणपती हा विशेष आहे. गणपती नावाशी संबंधित पुराणकथा या लाल रंगाच्या गणपतीमागे असल्याची आख्यायिका आहे. सावंतवाडी शहरातील चिटणीस, म्हापसेकर, पारकर व माठेवाडा येथील राजश्री तिसरे खेमसावंत यांच्या माठ्यात लाल रंगाचा गणपती आजही पूजला जातो.