गुटखा विक्री करू नका

राजू मसुरकर यांचं पानपट्टी व्यावसायिकांना आवाहन
Edited by: विनायक गांवस
Published on: August 24, 2025 11:01 AM
views 235  views

सावंतवाडी : गुटखा विक्रीला कायद्याने बंदी असूनही अनेक पानपट्टी व्यावसायिक आपल्या उदरनिर्वाहासाठी ही विक्री करतात. पण, या गुटखा विक्रीमुळे होणारे गंभीर परिणाम आणि कायद्याने होणारी शिक्षा याची त्यांना कल्पना नसते. या गंभीर परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि कॅन्सरसारख्या आजारांपासून नागरिकांचे रक्षण करण्यासाठी जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांनी जिल्ह्यातील सर्व पानपट्टी व्यावसायिकांना आवाहन केलं आहे.

मसूरकर यांनी सांगितलं की, गुटखा विक्री करताना पकडल्यास व्यावसायिकांना साडेसात वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते. कायद्याच्या या चक्रात अडकल्यावर त्यांना पोलिसांची कारवाई, न्यायालयाच्या फेऱ्या आणि वकिलांसाठी लाखो रुपयांचा खर्च सहन करावा लागतो. इतकंच नाही, तर काही व्यावसायिक अन्नभेसळ विभागातील अधिकाऱ्यांना लाच देऊन गुटख्याचा अहवाल बदलून घेतात. पण या सर्व गोष्टींमध्ये त्यांचा खूप पैसा आणि वेळ खर्च होतो. या संकटापासून वाचण्यासाठी आणि समाजात एक सकारात्मक बदल घडवण्यासाठी त्यांनी पानपट्टी व्यावसायिकांना एक सोपा उपाय सुचवला आहे.

गुटख्याऐवजी, पानपट्टी व्यावसायिकांनी काळी मिरी पावडर आणि मसाला वेलची पावडरचा वापर करावा असं आवाहन त्यांनी केलं आहे. यामुळे ग्राहकांना झणझणीत आणि स्वादिष्ट अनुभव मिळेल. त्याचबरोबर, या उपायामुळे ते कायद्याच्या अडचणीतून वाचतील आणि समाजाला कॅन्सरसारख्या गंभीर आजारांपासून वाचवण्यासाठी मदत करतील. गुटख्यामुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होतात. अशा परिस्थितीत, प्रत्येक व्यावसायिकाने जबाबदारीने वागून गुटखा विक्री पूर्णपणे थांबवावी आणि समाजाचं हित जपण्याला प्राधान्य द्यावं. त्यांचा हा संदेश केवळ एका व्यवसायापुरता मर्यादित नसून, तो समाजाला आरोग्य आणि सुरक्षिततेकडे घेऊन जाणारा एक महत्त्वाचा प्रयत्न आहे असं आवाहन त्यांनी केले आहे.