सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी नुकतीच कणकवली येथील एका मटका अड्ड्यावर धाड टाकली. त्यांनी स्वतःव्हिडिओग्राफरसोबत जाऊन बुकींचे मोबाईल आणि पैसे जप्त केले. या घटनेनंतर २४ तासांच्या आत कणकवलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलंबित झाले. ही कारवाई स्वागतार्ह असली तरी, जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कर्करोगाच्या रुग्णाला पॅरासिटॅमोलची गोळी देण्यासारखं आहे असा टोला उबाठा शिवसेनेचे प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी व्यक्त केले आहे.
ते म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मटका, जुगार, अवैध दारू आणि ड्रग्जचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर एका पोलीस निरीक्षकाचे निलंबन म्हणजे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना हे अवैध धंदे माहीत नाहीत का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्यांच्या परवानगीशिवाय हे धंदे चालणे शक्य नाही. त्यामुळे खरी कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांवर व्हायला हवी, असे डॉ. परुळेकर यांचे म्हणणे आहे. तसेच दोडामार्गसह इतर तालुक्यांमधील शेकडो एकर जमिनी परप्रांतीय लॅंड माफियांनी हडप केल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला आहे. यासाठी महसूल विभाग जबाबदार नाही का ? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. तसेच, बांदा चेकपोस्टवरील मोठ्या भ्रष्टाचाराच्या चर्चांवरही त्यांनी लक्ष वेधले आहे. पालकमंत्री यांनी सुरू केलेली ही मोहीम चांगली आहे. पण, यातून हप्तेखोरी वाढू नये अशी अपेक्षा डॉ. परुळेकर यांनी व्यक्त केली आहे.