
सावंतवाडी : आंबेगाव (चावडीवाडी) येथील 65 वर्षीय दत्ताराम सखाराम कुंभार हे गव्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर बांबोळी येथे उपचार सुरू आहेत.
दत्ताराम कुंभार हे आपलं काम संपवून घराकडे परत येत असताना त्यांना रस्त्यात गव्याने जोरदार धडक दिली. या हल्ल्यात त्यांच्या बरगड्या तुटल्या असून, आत मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आहे. त्यामुळे त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
या घटनेची माहिती त्यांचे पुत्र पुंडलिक कुंभार यांनी दिली आहे. या दुर्घटनेनंतर आंबेगाव आणि कुणकेरी ग्रामस्थांनी वनविभागाकडे मदतीची मागणी केली आहे. वनविभागाने जखमी दत्ताराम कुंभार यांना उपचारासाठी योग्य ते सहकार्य करावं आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.