लक्ष्मी परब यांचा खास सन्मान

Edited by: विनायक गांवस
Published on: August 24, 2025 11:08 AM
views 134  views

सावंतवाडी : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना अन्न धान्याचे उत्कृष्ट व पारदर्शक वितरण केल्याबद्दल जिल्हा महसूल विभागाच्यावतीने  लक्ष्मी राघो परब यांचा प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. सन १९८५ पासून गेल्या चार दशकांपासून  परब दांपत्याच्या प्रामाणिक व तत्पर सेवेची दखल घेऊन त्यांचा हा सन्मान करण्यात आला.

लक्ष्मी राघो परब या रेशन दुकानच्या परवानाधारक असून त्यांचे पती राघो बाबू परब व्यवस्थापक आहेत. सावंतवाडी शहरात डी, ई, एफ वार्डात त्यांचे सरकारमान्य धान्य दुकान आहे.

लक्ष्मी परब या चराठा गावच्या माजी ग्रामपंचायत सदस्य असून सावंतवाडी नगरपालिकेच्या दक्षता समितीवर स्वीकृत सदस्य आहेत. त्यांनी सावंतवाडीसह दोडामार्ग तालुक्यात अनेक सरकार मान्य रेशन दुकानामार्फत ग्राहकांना सेवा दिली. कोरोना काळातही त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून ग्राहकांच्या सेवेला प्राधान्य दिले. 

           सामाजिक कार्यातही या दांपत्याचा सक्रिय सहभाग असतो. यापुढेही शासनाच्या विविध योजनांचे अन्नधान्य ग्राहकांना तत्पर सेवा देण्यात प्राधान्य देण्यात असल्याचे त्यांनी सांगितले. ग्राहकांच्या या सेवेदरम्यान त्यांना आमदार दीपक केसरकर, प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार श्रीधर पाटील, पुरवठा अधिकारी यांचे नेहमीच सहकार्य लाभले. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, पी. एम. विश्वकर्मा समितीचे सदस्य प्रभाकर सावंत, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे, उपजिल्हाधिकारी बालाजी शेवाळे, श्रीमती आरती देसाई तसेच सर्व उपविभागीय अधिकारी, तहासिलदार उपस्थित होते.