
सावंतवाडी : सरकार कोणाचेही येऊदेत सिंधुदुर्गसह सावंतवाडीतील सामान्य, गोरगरीब रूग्णांचे हाल काही थांबत नाहीत. रोज नवनव्या आश्वासनाच गाजर राज्य सरकार, लोकप्रतिनिधी देतात. प्रत्यक्षात मात्र ना डॉक्टर हजर होत ना उपचाराअभावी जाणारे जीव थांबत. त्यात आता स्टाफचाही अभाव असल्याने सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान व युवा रक्तदाता संघटना यांच्यामार्फत मागच्या वर्षापासून रात्रीच्या वेळी अपघात विभागमध्ये स्टाफ द्यावा अशी मागणी करण्यात आली होती. परंतु, या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे. रात्रीच्यावेळी अपघात विभागामध्ये फक्त एकच सिस्टर आणि एक वॉर्ड बॉय असतो अशी नाराजी रवी जाधव यांनी व्यक्त केली आहे. सात ते आठ रुग्ण एकाच वेळी आले तर एका सिस्टरची खूप धांदल उडते, असे श्री जाधव म्हणाले.
दरम्यान, काल रात्रीची परिस्थिती पाहिली असता एकाच वेळी पाच रुग्ण उपचारासाठी आले. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते रवी जाधव व लक्ष्मण कदम यांच्या मदतीमुळे त्या रुग्णांना हाताळणे सोपे झाले. त्यावेळी ड्युटी बजावत असलेल्या सिस्टरने त्यांचे आभारही मानले. यात गवा रेड्याने मारलेला रुग्ण ,सिलिंग फॅन तुटून चेहऱ्यावर गंभीर दुखापत झालेले दोन रुग्ण, धाप लागून सिरीयस झालेला रुग्ण, मेंदू विकाराचा एक रुग्ण तसेच गळफास लावून आत्महत्या केलेल्या दोन डेडबॉडी हे सर्व एकाचवेळी आले होते. यावेळी येथे उपस्थित सिस्टरची धांदल उडाली होती. यावेळी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठाचे सदस्य रवी जाधव व लक्ष्मण कदम यांनी सहकार्य केले. यात अचानक संपलेल्या ऑक्सिजनमुळे रुग्णाच्या नातेवाईकांची धावपळ झाली. यावेळी श्री. जाधव यांनी मोठ्या परिश्रमाने ऑक्सिजन सिलिंडर चालू केले. त्यामुळे रुग्णांना त्वरित ऑक्सिजन मिळाला. ही परिस्थिती पाहता माजी नगरसेवक सुदन आरेकर यांनीही हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. परंतु, ही परिस्थिती पाहून तेही हतबल झाले.
मागील वर्षापासून सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान व युवा रक्तदाता संघटना यांच्या माध्यमातून फिजिशियन द्या अशी मागणी होत असून ती पूर्ण होत नाही. शासन रूजू होण्याचे आदेश देऊन फक्त गोडगोड बातम्या देत. प्रत्यक्षात डॉक्टर रूजू होत नाहीत. असलेल्या डॉक्टरांना मिळणाऱ्या सेवांची तर विचारता सोय नाही आहे. सरकारी रुग्णालयात नसलेला स्टाफ, डॉक्टरांचा अभाव बघता गोवा बांबोळी शिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालय हे 'यमा'च घर होऊन बसलं आहे. उपचाराविनाच लोकांचे जीव जात आहेत. गोव्यात पोहचण्यापूर्वी काहींचे वाटेतच अंत होत आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी निदान अपघात विभागामध्ये येत्या दोन दिवसात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील यांनी रात्रीच्यावेळी दोन सिस्टर द्याव्या, डॉक्टरांची नियुक्ती करावी अशी विनंती श्री. जाधव यांनी केली आहे.