
सावंतवाडी : न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या भारत सरकार संचलित उपक्रमाअंतर्गत ऍटम ऑन व्हील हा अणु ऊर्जेसंबंधीत जनजागृती कार्यक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबवला जात असून माऊली माध्यमिक विद्यालय सोनुर्ली या विद्यालयातील विद्यार्थ्यांना या विषयाचा लाभ घेण्याचे नियोजन विद्यालयातर्फे करण्यात आले होते.
या उपक्रमाअंतर्गत ऊर्जेचे विविध स्रोत त्यांपासून विद्युतनिर्मितीसाठी वापरली जाणारी पद्धत, उपयुक्तता,अडचणी, धोके व त्याबाबत असलेल्या गैर समजुती यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. अणुऊर्जेसाठी युरेनियम सारखे इंधन वापरून त्याच्या अणुच्या विखंडणामुळे साखळी अभिक्रियेद्वारे ऊर्जा कशी निर्माण केली जाते.अणुभट्टीची सुरक्षा तसेच तिथे कार्यरत कर्मचारी व परिसरातील सामान्य नागरिकांना आरोग्य विषयक घ्यावयाची सुरक्षितता तसेच यासंबंधी असलेल्या गैरसमजुती या सर्वांसंबंधी मार्गदर्शन व्हिडीओ व विविध पोस्टरद्वाद्वारा फिरत्या वाहिनीतून आलेल्या टीमने दिली. विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाशी निगडीत असलेल्या तसेच भविष्याची विजेची गरज भागविण्यासाठी मुख्य असलेल्या स्रोतासंबंधी जनजागृती उपक्रमाचे प्रमुख प्रमोद ठाकरे (नागपूर) यांनी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरे देऊन सविस्तर मार्गदर्शन केले. आगामी काळात आपल्याच जवळ होऊ घातलेल्या जैतापूर प्रकल्पापासून होणारी वीजनिर्मिती, सुरक्षितता व रोजगारनिर्मिती या सर्व पैलूंवर चर्चा केली.यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण तेरसे यांनी उपस्थित टीमचे स्वागत केले तसेच विज्ञान शिक्षक पांडुरंग काकतकर यांनी या उपक्रमाची विज्ञान विषयाच्या अभ्यासक्रमाशी सांगड घालून उद्देश विषद केला तर प्रदिप सावंत,नितीन गवंडळकर यांनी चर्चेत सहभागी होऊन याविषयीचे विद्यार्थ्यांचे शंका समाधान केले यासाठी शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थांही सहकार्य मिळाले.विद्यार्थ्यांना नाविण्यपूर्ण विषयाचे सातत्याने उपक्रम राबविणाऱ्या या विद्यालयाची सदर या उपक्रमासाठी निवड केल्याबद्दल टीमचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.