
सावंतवाडी : सहयोग ग्रामविकास मंडळ, गरड माजगांव आणि श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आज श्री पंचम खेमराज महाविद्यालयात जिल्हास्तरीय (वरिष्ठ महाविद्यालय) काव्य वाचन स्पर्धा व मालवणी कवी दादा मडकईकर यांच्या "मालवणी काव्य गायन" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा शुभारंभ सावंतवाडी संस्थानच्या राणीसाहेब शुभदादेवी भोसले यांच्या हस्ते झाला.
यावेळी राणीसाहेब शुभदादेवी भोसले यांनी मालवणी भाषा आणि संस्कृतीचे जतन करणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. तसेच, युवकांनी अशा उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात मालवणी कवी दादा मडकईकर यांनी आपल्या खास शैलीत "मालवणी काव्य गायन" सादर करत उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या काव्य गायनाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाला साहित्यिक विनय सौदागर, साहित्यिक प्राचार्य राजेंद्र मांद्रेकर, प्रा. एम. व्ही. कुलकर्णी, कोमसापचे जिल्हा सचिव ॲड. संतोष सावंत, कोमसाप सावंतवाडी तालुकाध्यक्ष दीपक पटेकर, बाळकृष्ण राणे, प्राचार्य प्रा.डॉ. भारमल, प्रा. गोडकर, गोठोस्कर, प्रा. बाळासाहेब नंदीहळ्ळी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.