
सावंतवाडी : अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. बाजारपेठेत वाहनांची होणाऱ्या प्रचंड गर्दीमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पोलिस प्रशासन आणि नगरपरिषद प्रशासनाचा उत्सवपूर्व नियोजनाचा अभाव दिसत असल्याने ही वाहतूक कोंडी होत आहे.
पोलिस अन् न.प. प्रशासनाच्या नियोजनातील दुर्लक्षामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. बाजारपेठेतील अरुंद रस्ते वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरत आहेत. त्यात गणेशोत्सवानिमित्त बाजारपेठांत ग्राहक वर्गाची रेलचेल वाढली आहे. बेशीस्तपणे रस्त्याच्या कडेला दुचाकी व चारचाकी वाहने उभी केल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या अधिकच बिकट झाली आहे. यावर वाहतूक पोलिसांकडून कारवाई देखील होत असताना शिस्तीचा अभाव दिसून येत आहे. मुख्य बाजारपेठेत बराचवेळ वाहनांची रांग लागलेली दिसते.
प्रशासनाचे दुर्लक्ष आणि नियोजनाचा अभाव असल्यामुळे गणेशोत्सव पार्श्वभूमीवर नियोजन करणं आवश्यक बनले आहे. बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढणार असून वाहतुकीचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. त्यात शहरात वाहतूक पोलिसांची संख्या अपुरी असून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी अधिकच पोलिस बळ स्थानिक पोलिस ठाण्यात उपलब्ध करण आवश्यक आहे. प्रशासनाने यावर उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.