
सावंतवाडी : शहरात मोकाट गुरांचा वावर वाढत चालला आहे. या गुरांमुळे शहरात वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून त्यांच्या रस्त्यावर मोकाट फिरण्याने रात्रीच्या वेळेला अपघात सारखे प्रसंग उद्भवत आहेत त्यामुळे त्यांचा नगरपालिका प्रशासनाने योग्य तो बंदोबस्त करावा अशी मागणी उद्भव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे सावंतवाडी प्रवक्ते आशिष सुभेदार यांनी केली आहे.
सावंतवाडी शहरात भटके कुत्रे आणि मोकाट फिरणाऱ्या गायींचा वावर वाढला आहे. बहुतांशी या गुरांचे मालक त्यांना मोकळे सोडून देत असून त्यांची योग्य निगा राखली जात नाही परिणामी ही गुरे शहरातील रस्त्यावर बेवारस फिरताना आढळून येतात. वाहन चालवताना गुरांचा अडथळा सहन करावा लागतो तर कधी कधी रात्रीच्या वेळी वाहन चालवताना गुरे नजरेस पडत नसल्याने त्यांना ठोकर देत अपघात देखील होत आहेत. शहरातील समाज मंदिर, भटवाडी, जिमखाना, खासगीलवाडा सालइवाडा, शिरोडा नाका भाजी मार्केट या ठिकाणी हमखास मोकाट गुरे दिसून येत असून मोती तलावाच्या फुटपाथवर ती सातत्याने फिरताना दिसून येतात यामुळे नागरिकांनाही त्रास सहन करावा लागतो. शहरातील रस्त्यावर अथवा रस्त्याच्या कडेला गुरे आढळून येत असल्याने शहराच्या सौंदर्याला ही बाधा पोहचत आहे.
त्यामुळे या गुरांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. सावंतवाडी सध्याच्या भाजी मंडई परिसरात मोकाट गुरांसाठी कोंडवाडा उभारण्यात आला होता मात्र त्यानंतर बेवारस फिरणाऱ्या गुरे बैल व गायींची संख्या वाढू लागल्याने ती जागा अपुरी पडू लागली. शिवाय हा कोंडवाडा बंद करून त्याजागी स्टैंड करण्यात आल्याने आता भटक्या गायींसाठी जागाच उरलेली नाही अशी परिस्थिती आहे. यामुळे शहरात वारंवार फिरणाऱ्या गायीना एका ठिकाणी ठेवून त्यांच्या चारा पाण्याची व्यवस्था करण्यात यावी निगा राखली जावी तर जे कोणी गायींचे मालक असतील त्यांनी ती परत देण्यात यावीत अन्यथा मोकाट सोडल्यास त्यांना दंड आकारण्यात यावा अशी मागणी सुभेदार यांनी केली आहे.