
सावंतवाडी : मळगाव - नेमळे रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून, वाहनधारकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यामुळे रस्त्याची दुरवस्था अधिकच वाढली आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने अपघातांची शक्यता निर्माण झाली आहे.
या रस्त्यावरून दररोज शाळकरी मुले, कामगार व शेतकरी वर्ग प्रवास करतात. सकाळ - संध्याकाळ वाहनांची वर्दळ वाढत असल्याने धोका अधिक जाणवत आहे. दुचाकीस्वारांना समोरून येणाऱ्या वाहनांच्या प्रकाशात खड्डे दिसत नाहीत आणि त्यामुळे संतुलन बिघडून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. गणेश चतुर्थी सण जवळ येत असल्याने अशा वेळी रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होऊन अपघाताचा धोका आणखीनच वाढेल, अशी भीती ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. स्थानिक ग्रामस्थांनी अनेक वेळा संबंधित विभागाकडे दुरुस्तीची मागणी केली आहे. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. ग्रामस्थांनी प्रशासनाने तातडीने दखल घेऊन गणेश चतुर्थीपूर्वी रस्ता दुरुस्त करावा, अशी जोरदार मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.