
सावंतवाडी : जिल्ह्यातील आरोग्य, रोजगार प्रश्न सोडविण्यासाठी पक्षविरहीत सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे. चार ठिकाणी तोंड असल्याने ही परिस्थिती आहे. ही परिस्थिती बदलली नाही तर आपला भाग गोव्यात विलिन होईल असे मत माजी आमदार शिवराम दळवी यांनी व्यक्त केले.
सावंतवाडी येथील ऐतिहासिक श्री देव पाटेकर चरणी श्रावण समाप्ती निमित्ताने श्री. दळवी यांनी सेवा केली. याप्रसंगी जिल्ह्यातील सामाजिक परिस्थितीवरही त्यांनी भाष्य केले. रोजगार, वैद्यकीय परिस्थिती तशीच आहे. आपल्यामुळेच काही रोजगार झाले नाहीत, काही प्रकल्प बंद पडले. हॉस्पिटल आहे पण डॉक्टर नाही अशी परिस्थिती आहे. ही परिस्थिती बदलली नाही तर आपला भाग गोव्यात विलिन होईल असं मत त्यांनी व्यक्त केले. तसेच युपी, बिहार, दिल्लीती परप्रांतीय लोक इथे येऊन जमिनी विकत घेत आहेत. डोंगर घेऊन रस्ता मागत आहेत. त्यामुळे मी एकट्याने बोलून काही होणार नाही. सर्वांनी एकत्र येऊन देवाला साकडं घातलं तरच हे प्रश्न मार्गी लागतील. त्यासाठी सर्वांनी पक्षीय झेंडे बाजूला ठेवून एकत्र देवाला साकडं घालण आवश्यक आहे असं मत श्री. दळवी यांनी व्यक्त केले. यावेळी श्री देव पाटेकर मंदिरामध्ये भाविक उपस्थित होते.